मुंबई | 13 सप्टेंबर 2023 : बॉलिवूड आणि घराणेशाही हा वाद आता काही नवीन राहिलेला नाही. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर घराणेशाहीच्या मुद्द्यावरून मोठी चर्चा झाली होती. त्यावर सर्वसामान्यांपासून इंडस्ट्रीतील अनेक कलाकारसुद्धा मोकळेपणे व्यक्त झाले होते. आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून मोठं वक्तव्य केलंय. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. मंगळवारी पार पडलेल्या या ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी घराणेशाहीवर भाष्य केलं.
नाना पाटेकर हे त्यांच्या दमदार अभिनय आणि सर्वसामान्य जीवनशैली साठी ओळखले जातात. फिल्म इंडस्ट्रीबद्दल ते म्हणाले की इथे स्टार किड्सना प्रेक्षकांवर थोपवलं जातं. घराणेशाहीच्या मुद्द्यावर ते पुढे म्हणाले, “आता मी एक अभिनेता आहे. उद्या मला माझ्या मुलाला अभिनेता बनवायचं असेल. मग त्याच्यात ते अभिनय कौशल्य असो किंवा नसो. मात्र तरीही मी प्रेक्षकांवर त्याला थोपवेन. त्याचे एक-दोन चित्रपट फ्लॉप ठरतील, मात्र त्यानंतर प्रेक्षकांना त्याच्यातील चुका कमी दिसू लागतील आणि हळूहळू ते त्याला स्वीकारतील. असं करता करता अखेर एके दिवशी तो आपल्या डोक्यावर येऊन बसेल. सध्या इंडस्ट्रीत असंच काहीसं चित्र दिसून येतंय. फिल्म इंडस्ट्रीच सध्या असेच चित्रपट बनतात, ज्यांना प्रेक्षकांवर बळजबरीने थोपवलं जातंय. अशात जेव्हा ‘द वॅक्सीन वॉर’सारखे चित्रपट प्रदर्शित होतात तेव्हा आपल्याला कळतं की, या दोन चित्रपटांमध्ये खूप फरक आहे.”
या कार्यक्रमात नाना पाटेकरांनी अप्रत्यक्षपणे ‘गदर 2’ या चित्रपटावरही निशाणा साधला. बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणारा चित्रपट त्यांनी पाहिल्याचं सांगितलं. मात्र चित्रपट संपेपर्यंत मी सहन करू शकलो नाही, त्यामुळे मी पूर्ण चित्रपट पाहिला नाही, असंही ते म्हणाले. हल्ली ठराविक प्रकारचेच चित्रपट बनवले जातात आणि प्रेक्षकांना ते बळजबरीने पहायला लावलं जातं, असाही टोला त्यांनी लगावला.