अभिनेते नाना पाटेकर यांना ‘मी टू’ प्रकरणी अखेर दिलासा मिळाल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरु आहे. लैंगिक छळाचा आरोप झाल्याप्रकरणी नाना पाटेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाना पाटेकर यांच्याविरोधातील B समरी रिपोर्ट दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळून लावला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. मात्र हे आरोप सिद्ध करणारे पुरावे उपलब्ध नसल्याने दंडाधिकारी कार्यालयाने बी समरी रिपोर्ट फेटाळून लावला आहे.
त्यामुळे नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाल्याचं सांगितलं जातं. मात्र, तनुश्री दत्ताचे वकील नितीन सातपुते यांनी मात्र तनुश्रीची याचिका कोर्टाने रद्द केली नसल्याचा दावा केला आहे. बी समरी रिपोर्ट नाकारला असला तरी तनुश्रीची तक्रार कोर्टाने नाकारली नसल्याचं वकील नितीन सातपुते यांनी म्हटलं आहे.
तनुश्रीचे तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण
यावर आता तनुश्रीच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत स्वत: तनुश्रीने देखील तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर भाष्य केलं आहे. या निकालाबाबत नेमकं ती काय म्हणाली ते पाहुयात.
खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका
तनुश्रीने म्हटलं आहे “कृपया कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका, फसव्या आणि बदनामीकारक बी सारांश अहवाल न्यायालयाने फेटाळला आहे. माझ्या लैंगिक छळाचे प्रकरण नाही. 2019 मध्ये मुंबई पोलिसांनी दाखल केलेला बी सारांश अहवाल न्यायालयीन युक्तिवाद आणि खटल्यांच्या अनेक महिन्यांनंतर काल न्यायालयाने नाकारला. म्हणजे मुळात नाना पाटेकर यांच्यावरील लैंगिक छळाचे प्रकरण अद्याप सुरु आहे. दरवर्षी नानांची पीआर टीम केस बंद झाल्याबद्दल अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरवते आणि हा देखील तोच प्रकार करण्यात आला आहे. ते कोर्टात हे प्रकरण हरले म्हणून चुकीची माहिती पसरवण्याचा आणि मीडियाला गॅसलाइट करण्याचा प्रयत्न करत आहेत. कृपया पॅथॉलॉजिकल लबाड आणि त्याच्या पीआर टीमवर विश्वास ठेवू नका आणि कोर्टाचीही तथ्ये तपासा.” असं म्हणत तनुश्रीने नाना पाटेकरांना कोर्टाकडून दिलासा मिळाल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे.
“नानांचा आत्मा जळत आहे म्हणूनच अशा प्रकारे चुकीची माहिती पसरवली जात आहे”
पुढे ती म्हणाली आहे की, “नाना पाटेकर यांच्यावर लवकरच दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असून त्यांना याची माहिती आहे. मीडिया आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी नाना पाटेकरांच्या पीआरने पेरलेल्या या खोट्या बातम्या आहेत. मूळ केस अद्याप न्यायालयात सादर करण्यात आलेली नाही, मग कोणताही न्यायाधीश कसा निकाल देऊ शकतो. सध्याच्या न्यायालयीन सुनावणी फक्त 2019 मध्ये पोलिसांनी दाखल केलेल्या बी समनरी अहवालावर होती आणि निकाल त्या संदर्भात आहे. बी सारांश हा खटला बंद करण्याचा एक कमकुवत प्रयत्न होता पण माझ्या कायदेशीर टीमने त्या गोष्टीला बरोबर हाताळलं आहे आणि हा युक्तिवाद जिंकला! हा आमचा एक छोटासा विजय होता पण या निकालाने नानांचा आत्मा जळत आहे म्हणूनच अशा प्रकारे चुकीची माहिती पसरवली जात आहे. मिडीयाच्या खोट्या बातम्या तयार करण्यासाठी भरपूर पैसा लावला जात आहे. त्यांच्यावरील खटला बंद झालेला नाही. कृपया तथ्य तपासा” असं म्हणत तनुश्रीने कोर्टाची तथ्ये तपासून घेण्याची विनंती केली आहे.
दरम्यान तनुश्रीच्या या पोस्टनंतर किंवा तिच्या या दाव्यानंतर अभिनेते नाना पाटेकर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं आता महत्वाचं आहे.
नेमकं प्रकरण काय होतं?
अभिनेत्री तनुश्री दत्ताने २००८ मध्ये एका सिनेमाच्या शुटिंगदरम्यान डान्स सिक्वेन्सवेळी लैंगिक छळ झाल्याचा आरोप केला. या आरोपाखाली तिने नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य, दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दीकी आणि निर्माता राकेश सारंग यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात एफआयआर दाखल केली. याचआधारे पोलिसांनी पाटेकरांवर मी टू मोहिमेच्या अंतर्गत गुन्हा देखील दाखल केला.