64 वर्षीय अभिनेत्याचा उर्वशी रौतेलासोबत विचित्र डान्स; गाण्यावर टीकेचा वर्षाव

| Updated on: Jan 03, 2025 | 3:06 PM

अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या तेलुगू चित्रपटातील एक गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान ट्रोल होत आहे. या गाण्यात नंदमुरी बालकृष्ण आणि उर्वशी यांचे स्टेप्स पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत.

64 वर्षीय अभिनेत्याचा उर्वशी रौतेलासोबत विचित्र डान्स; गाण्यावर टीकेचा वर्षाव
Nandamuri Balakrishna and Urvashi Rautela
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेत्री उर्वशी रौतेला ‘डाकू महाराज’ या दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट त्यातील एका गाण्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार नंदमुरी बालकृष्ण यांची मुख्य भूमिका आहेत. नुकतंच त्यातील ‘डिबिडी डिबिडी’ (Dabidi Dibidi) हे गाणं लाँच करण्यात आलं. या गाण्यात बालकृष्ण यांचे काही गाजलेले डायलॉग्सही ऐकायला मिळतात. वाग्देवीनं हे गाणं गायलं असून कासरला श्याम यांनी त्याचे बोल लिहिले आहेत. तर एस. तमन यांनी हे गाणं संगीतबद्ध केलंय. मात्र या गाण्यात ज्याप्रकारे नंदमुरी बालकृष्ण आणि उर्वशी डान्स करतायत, ते पाहून नेटकरी चांगलेच चिडले आहेत. शेखर मास्टर यांनी या डान्सची कोरिओग्राफी केली असून त्यातील स्टेप्स अत्यंत आक्षेपार्ह असल्याची तक्रार नेटकऱ्यांनी केली.

या गाण्यातील काही स्टेप्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. ‘नंदमुरी बालकृष्ण आणि उर्वशी रौतेला यांच्या वयातील अंतराचा तरी मान राखून कोरिओग्राफी करायला हवी होती’, असं एकाने लिहिलंय. तर ‘याला डान्स म्हणायचं का? हे किती आक्षेपार्ह आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘हे मी काय पाहतोय? 64 वर्षांचा अभिनेता त्याच्या मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीसोबत असा आक्षेपार्ह डान्स करतोय. हिरोने तरी याला सहमती कशी दिली?’, असा सवाल आणखी एका युजरने केला. या कमेंट्समुळे या गाण्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होतेय. नंदमुरी बालकृष्ण हे 64 वर्षांचे असून उर्वशी 30 वर्षांची आहे.

हे सुद्धा वाचा

‘डाकू महाराज’ या चित्रपटाचं दिग्दर्शन बॉबी कोल्लीनं केलं असून येत्या 12 जानेवारी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून यामध्ये अभिनेता बॉबी देओल खलनायकाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बॉबी देओल तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. याआधी बॉबीने ‘कंगुवा’ या चित्रपटातून तमिळ इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. यामध्ये सुरिया, दलकर सलमान आणि श्रद्धा श्रीनाथ यांच्याही भूमिका होत्या.