मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर ते बिनधास्तपणे आपली मतं व्यक्त करतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावर टीका केली होती. “मुस्लिमांविरोधातील द्वेष हा आता जणू फॅशनच बनला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून सरकारद्वारे चतुराईने हा द्वेष पसरवला जातोय”, असं ते म्हणाले. त्यानंतर त्यांचं आणखी एक वक्तव्य समोर आलं आहे. “कट्टरता, प्रचारकी आणि दुष्प्रचार पसरवण्यासाठी बनवल्या गेलेल्या चित्रपटांविरोधात लढण्याचा एकमेव मार्ग आहे की कलाकारांनी आपला आवाज उठवला पाहिजे. मात्र असे कलाकार इंडस्ट्रीत फारसे नाहीत”, असं वक्तव्य नसीरुद्दीन शाह यांनी केलंय.
‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “जर तुमच्या आवाजात दम असेल आणि लोकांनी तुम्हाला ऐकावं अशी इच्छा असेल तर अशा चित्रपटांमध्ये काम करू नका, जे तुमच्या विचारांच्या विरोधात असतील किंवा असं कोणतंही काम करू नका, जे तुमच्या मनाविरुद्ध असेल. काही लोकांनी आवाज उठवला तर फरक पडू शकतो. मात्र दुर्दैवाने ते सगळे घाबरलेले आहेत. त्यांना सर्वांना विजयाच्या बाजूनेच राहायचं आहे.”
“कलेला एकट्याने ठीक केलं जाऊ शकत नाही. त्यासाठी ॲक्शन घेण्याची गरज असते. ही गोष्ट कोणत्याही भितीशिवाय येते. मात्र हा निर्भयपणाच यावेळी सर्वांत कमी आहे. उत्तर देणं हे कलेचं काम नाही. त्याला योग्य प्रश्न उपस्थित करता आले पाहिजेत”, असं ते पुढे म्हणाले. केवळ कलाच उपाय ठरू शकत नाही, त्याला कृतीचं समर्थन असावं लागतं आणि ती कृती निर्भयतेमुळेच होऊ शकते, असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र सध्याच्या घडीला ही निर्भयताच अनेकांमध्ये नाही, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली.
सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रचारकी असल्याची टीका अनेक सेलिब्रिटींकडून झाली. देशभरातून या चित्रपटाला विरोध झाला. इतकंच नव्हे तर तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली. मात्र तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने भारतात कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार केला आहे.