“मी हिंदी चित्रपट पाहणंच बंद केलंय कारण..”; नसीरुद्दीन शाह यांचा बॉलिवूडवर निशाणा

| Updated on: Feb 19, 2024 | 12:51 PM

नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत येतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूड चित्रपटांविषयी वक्तव्य केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य आता चांगलंच चर्चेत आलं आहे.

मी हिंदी चित्रपट पाहणंच बंद केलंय कारण..; नसीरुद्दीन शाह यांचा बॉलिवूडवर निशाणा
Naseeruddin Shah
Image Credit source: Instagram
Follow us on

नवी दिल्ली : 19 फेब्रुवारी 2024 | बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठीही ओळखले जातात. चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूड यांविषयी त्यांनी अनेकदा मोकळी मतं मांडली आहेत. आता पुन्हा एकदा ते बॉलिवूड चित्रपटांबद्दल बिनधास्तपणे व्यक्त झाले. यावेळी त्यांनी बॉलिवूड सेलिब्रिटी आणि हिंदी चित्रपटांवर थेट निशाणा साधला आहे. हिंदी सिनेसृष्टीत काहीतरी उत्तम तेव्हाच घडू शकेल तेव्हा पैसे कमावण्यासाठी चित्रपट बनणं बंद होतील, असं ते म्हणाले. नवी दिल्लीत पार पडलेल्या ‘मीर की दिल्ली, शाहजहांनाबाद : द इवॉल्विंग सिटी’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

“मी हिंदी चित्रपट पाहणं बंद केलंय”

“हिंदी चित्रपट निर्माते गेल्या 100 वर्षांपासून एकाच प्रकारचे चित्रपट बनवत आहेत. हे वास्तव पाहून माझी खूप निराशा होते. हिंदी सिनेसृष्टी 100 वर्षे जुनी असल्याचं आपण गर्वाने सांगतो, पण आपण सतत एकाच प्रकारचे चित्रपट बनवतोय, हे वास्तव आहे. म्हणूनच मी हिंदी चित्रपट पाहणं बंद केलंय. मला ते अजिबात आवडत नाहीत. हिंदुस्तानी जेवणाला प्रत्येक ठिकाणी पसंत केलं जातं, कारण त्यात दम आहे. पण हिंदी चित्रपटांमध्ये दम का नाही? जगभरातील भारतीय हिंदी चित्रपट पाहतात, कारण त्यांना आपल्या घराशी जोडल्याची भावना निर्माण होते. मात्र लवकरच लोकांना या गोष्टीचा वीट येईल”, असं ते म्हणाले.

“पैसे कमावण्याच्या उद्देशाने चित्रपट बनवणं बंद होईल तेव्हाच..”

याविषयी बोलताना ते पुढे म्हणाले, “हिंदी चित्रपटांसाठी तेव्हाच थोडीफार आशा निर्माण होईल जेव्हा ते फक्त पैसे कमावण्याच्या उद्देशाने चित्रपट बनवणं बंद करतील. चित्रपट म्हणजे केवळ पैसे कमावण्याचं साधन आहे, या दृष्टीकोनातून पाहणं ते बंद करतील. पण मला असं वाटतं की आता खूप उशीर झाला आहे. यावर आता काही उपाय नाही कारण ज्या चित्रपटांना हजारो लोक पाहतात तसे चित्रपट बनत राहतील आणि लोक त्याला बनवत राहतील. त्यामुळे ज्या लोकांना गंभीर मुद्द्यांवर चित्रपट बनवायचं असेल, त्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी वास्तविकता दाखवावी आणि ती अशा पद्धतीने दाखवावी की बदल्यात त्यांना कोट्यवधी रुपये मिळू नये किंवा ईडी त्यांचं दार ठोठवू नये.”

हे सुद्धा वाचा

नसीरुद्दीन शाह यांनी याआधी ‘गदर 2’, ‘द काश्मीर फाइल्स’ यांसारख्या चित्रपटांवरही टीका केली होती. “द केरळ स्टोरी आणि गदर 2 यांसारखे चित्रपट मी पाहिले नाहीत पण मला माहीत आहे की ते कशाबद्दल आहेत. द काश्मीर फाइल्ससारखा चित्रपट इतका लोकप्रिय होत असल्याचं पाहून खूप त्रास होतो. दुसरीकडे सुधीर मिश्रा, अनुभव सिन्हा आणि हंसल मेहता हे जेव्हा चित्रपटांमधून सत्य मांडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना लोकप्रियता मिळत नाही”, असं ते म्हणाले होते.