क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोविक यांच्यात काही आलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहेत. यावर हार्दिक किंवा नताशाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र टी-20 वर्ल्ड कपमधील भारताच्या विजयानंतर हार्दिकसाठी नताशाने कोणतीच पोस्ट न लिहिल्याने नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं होतं. वर्ल्ड कपच्या विजयात हार्दिकने मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर नताशाने त्याच्यासाठी कोणतीच पोस्ट लिहिली नव्हती. आता नताशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये स्वत:चा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगाबद्दल बोलताना दिसतेय.
नताशा म्हणाली, “मला आज जे ऐकण्याची खरोखर गरज होती, ते वाचून मी खूप उत्साहित झाले आहे. म्हणूनच मी कारमध्ये माझ्यासोबत ‘बायबल’ आणलंय. कारण मला त्यातील हा मजकूर तुम्हाला वाचून दाखवायचा आहे. यामध्ये असं म्हटलंय की, परमेश्वर तुमच्यापुढे जातो आणि तो तुमच्यासोबत असतो. तो तुम्हाला कधीच सोडणार नाही किंवा तुमचा त्याग करणार नाही. तुम्ही घाबरू नका किंवा निराश होऊ नका. जेव्हा जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट परिस्थितीतून जात असतो तेव्हा आपण निराश होतो, दु:खी होतो, हताश होतो. परंतु देव आपल्यासोबत कायम असतो. तुम्ही सध्या कोणत्या परिस्थितीत आहात, त्याविषयी त्याला आश्चर्य वाटत नाही. कारण त्याच्याकडे आधीपासूनच एक योजना तयार आहे.”
नताशा हे सर्व तिच्या वैवाहिक आयुष्यातील समस्यांविषयी बोलत असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे. नताशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘पांड्या’ हे आडनाव आणि लग्नाचे फोटो काढून टाकल्याने घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र काही दिवसांनी हे फोटो पुन्हा तिच्या अकाऊंटवर पहायला मिळाले. हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्या आणि वहिनी पंखुडी शर्मा पांड्या सोशल मीडियावर नताशाच्या पोस्टवर कमेंट्स करताना दिसत आहेत. तर नताशासुद्धा त्यांचे कमेंट्स लाइक करतेय. त्यामुळे हार्दिकच्या कुटुंबीयांसोबत तिचं नातं अजूनही चांगलंच असल्याचं समजतंय.
नताशा ही माजी बिग बॉस स्पर्धक आणि डान्सर आहे. 31 मे 2020 रोजी तिने क्रिकेटर हार्दिक पांड्याशी लग्न केलं. याच वर्षी तिने मुलाला जन्म दिला. हार्दिक-नताशाच्या मुलाचं नाव अगस्त्य असं आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये या दोघांनी पुन्हा एकदा हिंदू आणि ख्रिश्चन विवाहपद्धतीनुसार लग्न केलं. या लग्नात त्यांचा मुलगासुद्धा सहभागी झाला होता.