लग्नाच्या चार वर्षांनंतर क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि मॉडेल नताशा स्टँकोविक यांनी घटस्फोट जाहीर केला. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या विभक्त होण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली. या पोस्टनंतर नताशा मुलगा अगस्त्यला घेऊन तिच्या माहेरी परतली आहे. नताशा ही सध्या सर्बियामध्ये असून तिथले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करतेय. अशातच हार्दिकची आई नलिनी पांडे यांच्या वाढदिवसाने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं. कारण त्यांची मोठी सून पंखुरीने त्यांच्यासाठी वाढदिवसानिमित्त खास पोस्ट लिहिली होती. मात्र नताशाने तिच्या पूर्व सासूसाठी सोशल मीडियावर कोणतीच पोस्ट लिहिली नाही. घटस्फोटानंतर नताशाला हार्दिकच्या संपत्तीचा 70 टक्के भाग मिळणार असल्याचीही चर्चा आहे.
20 जुलै रोजी नलिनी यांनी आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी कृणाल पांड्याची पत्नी पंखुरी हिने त्यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली होती. यासोबतच तिने एक फोटो पोस्ट केला होता. त्यामध्ये नलिनी या हार्दिक आणि नताशाचा मुलगा अगस्त्य आणि कृणाल – पंखुरीचा मुलगा कविर यांच्यासोबत आनंदाने वेळ व्यतित करताना दिसत आहेत. नताशाने सोशल मीडियावर नलिनी यांच्यासाठी कोणतीच पोस्ट लिहिली नाही.
गेल्या आठवड्यात हार्दिक आणि नताशाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित विभक्त होत असल्याचं जाहीर केलं होतं. त्याच्या एक दिवस आधीच नताशा मुलासोबत मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसली होती. मुलाला घेऊन ती सर्बियाला गेली असून इन्स्टाग्रामवर सातत्याने तिथले फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करतेय. फक्त नताशाच नव्हे तर हार्दिक आणि कृणाल यांनीसुद्धा आईच्या वाढदिवसानिमित्त कोणतीच पोस्ट लिहिली नव्हती. ‘एबीपी’ने दिलेल्या वृत्तानुसार, घटस्फोटानंतर नताशाला हार्दिकच्या संपत्तीपैकी 70 टक्के भाग मिळण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आली नाही.
हार्दिक आणि नताशाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं. हार्दिकने यामध्ये लिहिलं, ‘चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर नताशा आणि मी परस्परसंमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेत आहोत. आम्ही एकत्र राहण्याचा खूप प्रयत्न केला आणि नात्याला सर्वकाही दिलं. पण आमच्या दोघांच्या भल्यासाठी हाच निर्णय ठीक असेल असं आम्हाला वाटतं. कुटुंब म्हणून एकत्र राहिल्यानंतर, आनंदाने आणि आदराने एकमेकांचा सहवास अनुभवल्यानंतर हा निर्णय घेणं आमच्यासाठी खूप कठीण होतं. अगस्त्य हा आम्हा दोघांच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी नेहमीच राहील. आम्ही दोघं मिळून त्याचं संगोपन करू, जेणेकरून त्याच्या आनंदासाठी आम्ही आम्हाला शक्य ते सर्व प्रयत्न करू शकू. या कठीण आणि संवेदनशील काळात तुम्ही आम्हाला समजून घ्या अशी विनंती करतो.’