Uttara Baokar | राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री उत्तरा बावकर यांचं निधन; वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

| Updated on: Apr 13, 2023 | 9:13 AM

1984 मध्ये त्यांना हिंदी नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर 1988 मध्ये 'एक दिन अचानक' या चित्रपटातील भूमिकेसाठी आणि 1995 मध्ये 'दोघी' चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

Uttara Baokar | राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री उत्तरा बावकर यांचं निधन; वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Uttara Baokar
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : हिंदी, मराठी नाट्य आणि चित्रपटक्षेत्रात अमीट ठसा उमटवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर यांचं बुधवारी पुण्यात निधन झालं. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. त्या 79 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, भावजयी, भाचा असा परिवार आहे. सांगलीजवळील कुरुंदवाड इथं त्यांचं बालपण गेलं. त्यानंतरची जडणघडण दिल्लीत झाली. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या त्या विद्यार्थिनी होत्या. इब्राहिम अल्काझी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरा बावकर यांची अभिनय क्षेत्रातील जडणघडण झाली. त्या उत्तम गायिकासुद्धा होत्या.

संगीत विशारद असलेल्या उत्तरा यांनी अभिनयाचं शिक्षण घेण्यापूर्वी संस्कृत संगीत नाटकांतून भूमिका केल्या होत्या. 1984 मध्ये त्यांना हिंदी नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर 1988 मध्ये ‘एक दिन अचानक’ या चित्रपटातील भूमिकेसाठी आणि 1995 मध्ये ‘दोघी’ चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 80 च्या दशकातील चित्रपटांसोबतच त्यांनी अलिकडच्या ‘डोर’, ‘देव भूमी’ अशा हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. उडान, जस्सी जैसी कोई नही, रिश्ते यांसह अनेक मालिका, गिरीश कर्नाड लिखित तुघलकसह अनेक हिंदी आणि गुजराती नाटकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्याचसोबत हवेली, सरदारी बेगम, वास्तुपुरुष, उत्तरायण, आजा नचले, संहिता, इक्कीस तोफों की सलामी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.

हे सुद्धा वाचा

उत्तरा यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचे फोटो पोस्ट करत भावूक पोस्ट लिहिली आहे. ‘एक उत्कृष्ट अभिनेत्री. त्यांनी त्यांच्या असंख्य अविस्मरणीय नाटकांसह नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या रंगमंचावर राज्य केलं. सुमित्रा भावे यांच्या ‘नितळ’ चित्रपटात मला त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली. त्याचसोबत सुमित्रा यांच्याच ‘भैस बराबर’ या सीरिजमध्ये आणि बिपीन नाडकर्णींच्या ‘उत्तरायण’ चित्रपटात आम्ही एकत्र काम केलं. माझ्या होम प्रॉडक्शन अंतर्गत बनलेल्या ‘शेवरी’ या चित्रपटात माझ्या आईची भूमिका साकारण्यासाठी मी त्यांच्याकडे विनंती केली होती. त्यांनी ही विनंती स्वीकारली आणि चित्रपटात मोलाची कामगिरी केली. त्या अत्यंत उल्लेखनीय, अष्टपैलू कलाकार होत्या. उत्तरा ताई.. भावपूर्ण श्रद्धांजली’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.