राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त (National Cinema Day) 16 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये चित्रपट फक्त 75 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने (MAI) ही विशेष ऑफर दिली आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊननंतर थिएटर पुन्हा करण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रेक्षकांचे आभार मानण्यासाठी ही ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणारा ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा चित्रपटसुद्धा 75 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. मात्र ब्रह्मास्त्रच्या निर्मात्यांनी याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. PVR, Cinepolis यांसह देशातील 4000 चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जाणार आहे.
यावर्षी पहिल्यांदाच राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जाणार आहे. कोरोना महामारीमुळे जवळपास दोन वर्षे थिएटर बंद होते. चित्रपटांचा व्यवसाय पुन्हा एकदा सुरू झाल्याने त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातोय. प्रेक्षकांचं लक्ष पुन्हा एकदा थिएटर्सकडे वेधून घेण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल उचललं जात आहे.
थिएटर्स बंद असताना ओटीटीचं महत्त्व वाढलं. त्यामुळे नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राइम यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सना टक्कर देणं थिएटर मालकांना कठीण जात आहे. अशा परिस्थितीत अधिकाधिक प्रेक्षकांनी थिएटर्सकडे वळावं, यासाठी 16 सप्टेंबर रोजी कोणताही चित्रपट अवघ्या 75 रुपयांमध्ये पाहता येणार आहे.
Cinemas come together to celebrate ‘National Cinema Day’ on 16th Sep, to offer movies for just Rs.75. #NationalCinemaDay2022 #16thSep
— Multiplex Association Of India (@MAofIndia) September 2, 2022
रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होतोय. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 16 सप्टेंबर रोजी तिकिटांची किंमत कमी असल्याने यादिवशी चित्रपटासाठी थिएटर्समध्ये गर्दी पहायला मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ‘केजीएफ: चाप्टर 2’, ‘आरआरआर’, ‘भुल भुलैय्या 2’, ‘डॉक्टर स्ट्रेंज’ यांसारख्या चित्रपटांनी चांगली कमाई केली, असा दावा एमआयईने केला आहे. 75 रुपयांच्या ऑफरमध्ये तिकीट देणारे थिएटर्स त्यांच्या संबंधित सोशल मीडिया हँडलवर संपूर्ण माहिती देतील, असंही असोसिएशनने म्हटलं आहे. चित्रपटांच्या तिकिटांची किंमत जरी फक्त 75 रुपये असली तरी बुकिंग ॲप्स अतिरिक्त शुल्क आकारू शकतात.
अमेरिकेतही 3 सप्टेंबर रोजी अशा पद्धतीची ऑफर देण्यात आली होती. या दिवशी चित्रपटाच्या तिकिटांची किंमत फक्त 3 डॉलर होती. एरव्ही ही किंमत जवळपास 9 डॉलर्स इतकी असते.