नवज्योत सिंग सिद्धूंनी सांगितलं कपिल शर्माचा शो सोडण्यामागचं कारण; म्हणाले..

| Updated on: Nov 17, 2024 | 1:44 PM

नवज्योत सिंग सिद्धू हे पाच वर्षांनंतर कपिल शर्माच्या शोवर परतले. 2019 मध्ये त्यांना हा शो सोडावा लागला होता. त्यामागील कारण त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

नवज्योत सिंग सिद्धूंनी सांगितलं कपिल शर्माचा शो सोडण्यामागचं कारण; म्हणाले..
नवज्योत सिंग सिद्धू आणि कपिल शर्मा
Image Credit source: Instagram
Follow us on

कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांना पाच वर्षांनंतर पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या एका एपिसोडसाठी ते आले होते. पुलवामा हल्ल्यावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना 2019 मध्ये हा शो सोडावा लागला होता. त्यानंतर त्यांची जागा अभिनेत्री अर्चना पुरण सिंगने घेतली. आता नुकत्याच एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सिद्धू यांनी त्यांच्या शो सोडण्यामागचं कारण सांगितलं. त्याचप्रमाणे ते शोमधील काही कलाकारांच्या एक्झिटबद्दलही व्यक्त झाले.

सिद्धू म्हणाले, “माझं शोमधून बाहेर पडण्यामागे काही राजकीय कारणं होतं. त्याविषयी मला काही बोलायचं नाही. पण त्याशिवाय इतरही काही कारणं होती. पुष्पगुच्छातून एक-एक फुल निखळू लागलं होतं. तो पुष्पगुच्छ आधी जसा होता, तसा पुन्हा एकत्र यावा अशी माझी इच्छा आहे. ती प्रक्रिया सोपी करण्यास मी पुढाकार घेईन. त्याचा शो अजूनही चांगला चालतोय. कपिल खूप हुशार आहे.”

हे सुद्धा वाचा

इथे सिद्धू यांनी केलेल्या पुष्पगुच्छाचा अर्थ म्हणजे कपिलच्या शोमधील विविध कलाकार. या शोमधून बरेच कलाकार बाहेर पडले होते. त्यात उपासना सिंह, अली असगर आणि सुमोना चक्रवर्ती यांचा समावेश आहे. शोची मूळ टीम सोबत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. या मुलाखती सिद्धू कपिलच्या करिअरमधील कठीण काळाविषयी व्यक्त झाले. ते म्हणाले, “जेव्हा कपिलचा कठीण काळ सुरू होता, तेव्हा लोक मला म्हणायचे की तो संपलाय. तेव्हा मी त्यांना म्हणायचो की, कपिल 20 आहे आणि तुम्ही अशी व्यक्ती जरी शोधली जी 10 आहे आणि त्याला कपिलसमोर उभं केलं तरी मी ऐकून घेईन. पण आता 5 चीही व्यक्ती अस्तित्त्वात नाही. तुम्हाला त्याच्या जागी खूप चांगल्या कॉमेडियनला शोधावं लागेल. अन्यथा तुम्हाला सतत त्याचीच आठवण येईल. तुमच्याकडे त्याच्यासारखी हुशार व्यक्ती नाही. प्रतिभा जे शक्य आहे तेच करू शकते, पण हुशार व्यक्ती ते करतो जे करणं गरजेचं असतं.”

2019 मध्ये पुलवामा हल्ल्यावरून केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे त्यांना हा शो सोडावा लागला होता. त्यावेळी सिद्धू म्हणाले होते, “हे (दहशतवादी हल्ला) भ्याड आणि घृणास्पद कृत्य आहे आणि मी त्याचा तीव्र निषेध करतो. हिंसा नेहमीच निषेधार्ह असते आणि ज्यांनी ती केली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण मूठभर लोकांसाठी तुम्ही संपूर्ण देशाला दोष देऊ शकता का? एखाद्या व्यक्तीला तुम्ही दोष देऊ शकता का?” नवज्योत सिंग सिद्धूंच्या या वक्तव्याचे सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले होते. अनेकांनी त्यावेळी ‘द कपिल शर्मा शो’वर बंदी आणण्याची मागणी केली होती. ‘बॉयकॉट सिद्धू’ असा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. या वादानंतर कपिल शर्माच्या शोमध्ये सिद्धूंची जागा अर्चना पुरण सिंगने घेतली.