झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेत अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री वल्लरी विराज मुख्य भूमिकेत आहेत. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडतेय. एजे आणि लीला अशी या दोघांच्या भूमिकांची नावं आहेत. मालिकेत एजेची भूमिका साकारणारा राकेश बापट त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आला आहे. राकेशने अभिनेत्री रिधी डोग्राशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या आठ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. 2019 मध्ये राकेश आणि रिधी विभक्त झाले. त्याच्या दोन वर्षांनंतर राकेशच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एण्ट्री झाली होती. ‘बिग बॉस ओटीटी 1’मध्ये हे प्रेम फुललं होतं.
‘बिग बॉस ओटीटी 1’मध्ये राकेश बापट आणि अभिनेत्री शमिता शेट्टीच्या रिलेशनशिपची जोरदार चर्चा होती. शमिता शेट्टी ही अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण आणि बिझनेसमन राज कुंद्राची मेहुणी आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर ‘बिग बॉस 15’मध्ये राकेश त्याची गर्लफ्रेंड शमिताला पाठिंबा देण्यासाठी परतला होता. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. या शोच्या काही महिन्यांतच दोघांनी ब्रेकअप केलं. बिग बॉसच्या घरात राकेश आणि शमिताची जोडी खूप लोकप्रिय होती. बिग बॉसच्या घरात दोघं एकमेकांना पाठिंबा देताना, एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले. शो संपल्यावरही त्यांना डेटवर, फॅमिली फंक्शन्समध्ये, पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिलं गेलं होतं. मात्र काही कारणास्तव दोघांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला. या ब्रेकअपनंतर शमिताला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्रोलिंगला तिने सडेतोड उत्तरसुद्धा दिलं होतं.
‘माझ्या मते ही गोष्ट स्पष्ट करणं फार गरजेचं आहे. राकेश आणि मी आता सोबत नाही आहोत’, असं शमिताने लिहिलं होतं. तर राकेशनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित ब्रेकअपवर प्रतिक्रिया दिली होती. ‘शमिता आणि मी आता सोबत नाही आहोत. अत्यंत वेगळ्या परिस्थितीत नशिबाने आम्हाला एकत्र आणलं होतं. आम्हा दोघांवर प्रेम करणाऱ्या त्या सर्व चाहत्यांचे मी आभार मानतो. मला माझ्या ब्रेकअपविषयी असं जाहीररित्या सांगायचं नव्हतं. पण चाहते म्हणून तुम्हाला याबाबतची माहिती असावी म्हणून मी हे स्पष्ट केलं’, असं राकेशने लिहिलं होतं.