मुंबई : आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. भाऊ शमास सिद्दिकी आणि पत्नी अंजना पांडे (आलिया) यांच्याकडून सातत्याने त्याच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. अशातच आता नवाजुद्दीनने दोघांविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. नवाजुद्दीनने स्वत:च्याच भाऊ आणि पत्नीविरोधात 100 कोटी रुपयांचा नुकसानीचा दावा केला आहे. सुनील कुमार यांच्यामार्फत त्याने हा दावा ठोकला आहे. यावर येत्या 30 मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
नवाजुद्दीनने त्याच्या भावावर फसवणुकीचा आरोप केला आहे. नवाजने त्याचे क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड, बँक पासवर्ड त्याच्या भावाला दिले होते. शमास हा 2008 पासून नवाजचा मॅनेजर म्हणून काम करतोय. शमासने संयुक्तपणे मालमत्ता खरेदी केली होती. परंतु नवाजुद्दीनला सांगितलं की ते त्याच्या नावावर विकत घेतले जात आहेत. यामध्ये यारी रोडवरील एक फ्लॅट आणि सेमी कमर्शिअल मालमत्ता, बुलढाण्यातील एक जागा, शाहपूरमधील एक फार्महाऊस, दुबईमधील एक प्रॉपर्टी यासह रेज रोव्हर्स, बीएमडब्ल्यू, डुकाटी यांसारख्या 14 महागड्या गाड्यांचा समावेश होता.
भाऊ शमासने पत्नी अंजनाला त्याच्याविरोधात खटला दाखल करण्यास प्रवृत्त केल्याचाही आरोप नवाजुद्दीनने या याचिकेत केला आहे. या याचिकेत असाही दावा करण्यात आला आहे की, पत्नी अंजना पांडे (आलिया) हिचं आधीच एक लग्न झालं होतं. तरीसुद्धा नवाजुद्दीनशी लग्नापूर्वी तिने स्वत:ला अविवाहित मुस्लिम असल्याचं खोटं म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर मुलांच्या शिक्षणासाठी दर महिना दिलेले 10 लाख रुपये आणि प्रॉडक्शन हाऊस सुरू करण्यासाठी दिलेले अडीच कोटी रुपये तिने स्वत:च्या ऐशोआरामासाठी वापरले, असाही आरोप यात नवाजुद्दीनने केला आहे.
प्रॉपर्टी परत मागितली असता भाऊ शमास आणि पत्नी अंजनाने व्हिडीओ आणि सोशल मीडियावरील कमेंट्सद्वारे मला सतत ब्लॅकमेल केलं. मी दिलेल्या 20 कोटी रुपयांचा त्यांनी गैरवापर केला, असंही नवाजुद्दीनने याचिकेत म्हटलंय. 2020 मध्ये शमासने मॅनेजर म्हणून काम बंद केल्यानंतर प्राप्तीकर, जीएसटी आणि इतर सरकारी विभागांकडून 37 कोटी रुपये थकबाकी असल्याच्या कायदेशीर नोटिशी मिळाल्याचंही त्याने स्पष्ट केलं.
शमास आणि अंजना यांच्या खोट्या दाव्यांमुळे पुढील चित्रपटांचे प्रोजेक्ट्स रखडले आहेत, असाही आरोप नवाजुद्दीनने केला आहे. अपमानकारक व्हिडीओ आणि पोस्टमुळे तो सार्वजनिक कार्यक्रमांनाही उपस्थित राहू शकला नाही, असा दावा त्याने केला आहे. यासोबतच त्याने भाऊ आणि पत्नीकडून लेखी जाहीर माफीची मागणी केली आहे.