मुंबई: ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनीत ‘कांतारा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. प्रेक्षक-समिक्षकांकडून या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. इतकंच नव्हे तर टॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंतच्या कलाकारांनी कांताराची प्रशंसा केली. मात्र अशातच अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीच्या वक्तव्याची चर्चा होत आहे. कांतारा स्टार ऋषभ शेट्टीविषयी ईष्येची भावना असल्याचं नवाजुद्दीनने एका मुलाखतीत म्हटलंय. त्यावर आता ऋषभची प्रतिक्रिया समोर आली आहे.
ऋषभ शेट्टी आणि नवाजुद्दीन सिद्दिकी हे एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यादरम्यान नवाजुद्दीनला असा प्रश्न विचारण्यात आला होता की त्याला ऋषभविषयी ईर्षा वाटते का?
त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, “संपूर्ण देशाने ऋषभला पाहिलंय आणि सगळेच थक्क झाले आहेत. अर्थातच जर कोणी उत्तम काम करत असेल तर त्याच्याविषयी ईर्षा वाटणं साहजिक आहे. ते खूप चांगलं काम करत आहेत. मात्र ही वेगळ्या प्रकारची ईर्षा आहे. या ईर्ष्येमुळे तुम्ही आणखी चांगलं काम करण्यासाठी तयार होता.”
नवाजुद्दीनच्या या वक्तव्यावर ऋषभ शेट्टीनेही प्रतिक्रिया दिली. “मी नवाजुद्दीन भाईची अनेक चित्रपटं पाहिली आहेत. कठोर मेहनत आणि प्रयत्नांनी परिपूर्ण असा त्यांचा प्रवास मी पाहिला आहे. ते आमच्यासारखे आहेत, आम्ही मिडल क्लास (मध्यमवर्गीय) लोकं आहोत, ज्यांना कोणतीच पार्श्वभूमी नाही. मात्र या इंडस्ट्रीत यायचं आमचं स्वप्न होतं आणि इंडस्ट्रीला मोठं करायचं होतं,” असं तो म्हणाला.
“ही सर्वांत मोठी प्रेरणा आहे. त्यांची थिएटरपासून प्रवासाला सुरुवात केली आणि सुरुवातीला छोट्या भूमिकाही साकारल्या आहेत. मी सुद्धा कन्नड सिनेमांमध्ये आधी अशाच छोट्या भूमिका साकारायचो. आमचा प्रवास एकसारखाच आहे”, अशा शब्दांत त्याने कौतुक केलं.