मुंबई: बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका साकारून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीला लोकप्रियता मिळाली. फिल्म इंडस्ट्रीची पार्श्वभूमी नसताना, कोणीही गॉडफादर नसताना आणि विशेष म्हणजे मुख्य हिरोसारखी इमेज नसतानाही नवाजुद्दीनने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या भूमिकांविषयी आणि यशाविषयी मोकळेपणे वक्तव्य केलं. यावेळी त्याने एक शपथसुद्धा घेतली. 25 कोटी रुपये दिले तरी ते काम करणार नाही, असं नवाजुद्दीन म्हणाला.
“आता तर तुम्ही मला 25 कोटी रुपये दिले तरी मी छोटी भूमिका करणार नाही”, अशी शपथ नवाजुद्दीनने घेतली. पैसा आणि प्रसिद्धी या दोन गोष्टी मेहनतीवर अवलंबून असतात असंही त्याने म्हटलंय.
“माझा या गोष्टीवर विश्वास आहे की स्वत:ला अशा लायक बनवा की पैसा आणि प्रसिद्धी तुमचे गुलाम होतील आणि तुमच्यामागे धावतील”, असंही तो म्हणाला.
अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर 2’ या चित्रपटातील भूमिकेमुळे नवाजुद्दीन प्रकाशझोतात आला. त्यानंतर त्याने रमन राघव 2.0, फोटोग्राफ, हरामखोर, मंटो, मांझी यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. बजरंगी भाईजान, किक, बदलापूर आणि रईस या चित्रपटांमधील त्याच्या भूमिकाही खूप गाजल्या आहेत.
नवाजुद्दीन नुकताच ‘हिरोपंती 2’मध्ये झळकला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्याचे आगामी टिकू वेड्स शेरू, बोले चुडियाँ, जोगिरा सारा रा रा हे चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत.
नवाजुद्दीनचा आगामी ‘हड्डी’ हा चित्रपटसुद्धा चर्चेत आहे. यामध्ये तो ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेतील त्याचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.