दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनताराच्या आयुष्य आणि करिअरवर आधारित माहितीपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्यापूर्वी तिने अभिनेता आणि निर्माता धनुषला खुलं पत्र लिहिलं आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘नानुम रावडी धान’ या चित्रपटातील काही व्हिडीओ आणि गाणी नयनताराला तिच्या माहितीपटात वापरायची होती. यासाठी तिने धनुषकडून ‘एनओसी’ मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र धनुषने दोन वर्षांपर्यंत नयनताराला कोणतंच उत्तर दिलं नाही. अखेर तिने तिच्या मोबाइलमधील चित्रपटाच्या ‘बिहाइंड द सीन’चा तीन सेकंदांचा एक व्हिडीओ तिच्या माहितीपटात वापरला. त्यावरून धनुषने थेट तिला 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस बजावली. या नोटिशीनंतर नयनताराने सोशल मीडियावर हे खुल पत्र लिहित धनुषला फटकारलं आहे. धनुषने तिच्या आणि तिच्या पतीविरोधात असलेल्या वैयक्तिक आकसापोटी हे सर्व केल्याचा आरोप नयनताराने पत्रातून केला. त्याचप्रमाणे तीन सेकंदांच्या व्हिडीओसाठी 10 कोटी रुपयांची नोटीस पाठवणं हे नीच कृत्य असल्याचंही तिने म्हटलंय.
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या नयनताराच्या माहितीपटात तिची आणि तिचा पती-दिग्दर्शक विग्नेश शिवनची लव्ह स्टोरी दाखवण्यात येणार आहे. ‘नानुम रावडी धान’ या चित्रपटाच्या सेटवरच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. या चित्रपटाचा निर्माता धनुष होता, तर दिग्दर्शनाचं काम विग्नेशने केलं होतं. नयनतारा यामध्ये मुख्य भूमिकेत होती. मात्र या चित्रपटादरम्यान धनुष आणि नयनतारा, विग्नेश यांच्यात काही वाद झाले होते. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार स्वीकारताना नयनताराने धनुषला टोमणा मारला होता. “मला धनुषची माफी मागायची आहे, कारण त्याला या चित्रपटातील माझं काम अजिबात आवडलं नाही. धनुष, मला माफ कर, मी तुझी निराशा केली. पुढच्या वेळी मी कदाचित चांगलं काम करेन”, असं ती पुरस्कार सोहळ्यात जाहीरपणे म्हणाली होती. तेव्हापासून धनुष आणि तिच्यात वाद असल्याचं म्हटलं जातं.
आता नयनताराने तिच्या या खुल्या पत्रातून धनुषला चांगलंच सुनावलं आहे. “तुझ्या करिअरमधील सर्वांत हिट झालेल्या चित्रपटाबद्दल तू ज्या काही भयंकर गोष्टी बोलला होतास, ते मी आजही विसरले नाही. प्री-रिलिजदरम्यान तू जे शब्द वापरलेस, त्यांनी माझ्या मनावर खूप घाव केलेत. मला इंडस्ट्रीतील लोकांकडून समजलं की तो चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्याने तुझा अहंकार खूप दुखावला गेला होता”, असंही तिने धनुषला म्हटलंय. यावर आता धनुषकडून काय उत्तर मिळतंय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नयनताराचा हा माहितीपट येत्या 18 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.