चित्रपट हे मनोरंजनापेक्षा भारताच्या राजकारणात सत्तांतर करण्याच्या अधिक उपयोगी येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी काही हिंदी, मराठी चित्रपट आणि वेब सीरिजच्या कथानकावर प्रश्न उपस्थित केले आहेत. यात कंगना रनौतचा आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’ (Emergency), प्रसाद ओकचा ‘धर्मवीर’ (Dharmaveer) हा मराठी चित्रपट आणि प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणारी ‘मी पुन्हा येईन’ (Mi Punha Yein) या मराठी वेब सीरिजचा समावेश आहे. कंगनाचा इमर्जन्सी हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ नये, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
मी पुन्हा येईन या वेब सीरिजच्या टीझरमध्ये दोन पक्षाचे नेते सत्तेसाठी आमदारांची कशी पळवापळवी, फोडाफोडी करत आहेत, हे पहायला मिळालं. राजकारणावर आधारित या वेब सीरिजमध्ये कपट-कारस्थान, संधीसाधूपणा, आमदारांची मेगाभरती, फोडाफोडी, पळवापळवी आणि सध्या चर्चेत असलेलं ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ असा सगळा मसाला पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं जातंय. चित्रपट किंवा सीरिज निर्मितीकरता किमान काही महिन्यांचा अवधी लागतो. मात्र मी पुन्हा येईन ही सीरिज जर महाराष्ट्रात घडलेल्या घटनाक्रमावर आधारित असेल तर महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होताच 20 दिवसांत सीरिज कशी तयार होऊ शकते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
दुसरीकडे भाजप कंगना रनौतसारख्या लोकांना हाताशी धरून राजकीय व्यक्तीमत्त्वांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करून त्यातून नकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप बाबासाहेबांनी केला आहे. कंगनाचा इमर्जन्सी हा चित्रपट म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा राजकीय चरित्र हनन करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात हा चित्रपट आम्ही महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.