मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. कर्जतमधील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवलं आहे. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नितीन देसाई यांनी ‘लगान’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘मिशन काश्मीर’, ‘देवदास’, ‘खाकी’, ‘स्वदेस’ यांसारख्या चित्रपटांसाठी प्रॉडक्शन डिझायनर म्हणून काम केलं होतं. 2000 मध्ये त्यांनी ‘हम दिल दे चुके सनम’ आणि 2003 मध्ये ‘देवदास’ या चित्रपटांसाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. त्यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
नितीन देसाई यांनी त्यांच्या कारकिर्दीत असंख्य उल्लेखनीय कामं केली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी कार्यक्रमासाठी त्यांनी अवघ्या 20 तासांच मंच उभारला होता. मुंबईतील शिवाजी पार्कात हा भव्य मंच उभारण्यात आला होता. शपथविधीच्या कार्यक्रमानंतर अनेकांनी त्यांच्या कामाचं भरभरून कौतुक केलं होतं. या कार्यक्रमातील सर्वांत विशेष बाब म्हणजे सिंहासनावर आरूढ छत्रपती शिवाजी महाराजांची विशालकाय मूर्ती. ही संपूर्ण व्यवस्था नितीन देसाई यांनी 20 तासांत केली होती.
“मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी सेट डिझाइन करायचा होता. आमची बैठक झाली होती. त्यानंतर मी त्यांच्या समोर बसूनच संपूर्ण मॉडेल तयार करून घेतला. हा मॉडेल त्यांना खूप आवडला आणि त्यानंतर आम्ही काम सुरू केलं”, असं त्यांनी त्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं. या मॉडेलचा व्हिडीओसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
“आमच्याकडे तयारीसाठी फक्त 20 तास होते. उद्धवजी यांच्यासाठी हा सर्वांत मोठा क्षण होता. त्या कार्यक्रमासाठी आमच्यात इतका उत्साह होता की फक्त सर्वोत्तम काम करायचं असं आम्ही ठरवलं होतं. उद्धव ठाकरे हे स्वत: आर्टिस्ट आहेत. याआधीही मी त्यांच्या विविध कार्यक्रमांसाठी कला दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. त्यामुळे त्यांची आवड-निवड या सर्व गोष्टी मला ठाऊक होत्या. त्या सर्व गोष्टींचा विचार करूनच शपथविधीचा सेट डिझाइन केला होता”, असं ते पुढे म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी जवळपास 60 हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था नितीन देसाई यांनी केली होती. मात्र त्या कार्यक्रमाला जवळपास अडीच लाख लोक उपस्थित होते.