ओटीटीवरील सर्वांत लोकप्रिय वेब सीरिजचा तिसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 28 मे पासून ‘पंचायत 3’ ही सीरिज प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होत आहे. सोमवारी रात्री या सीरिजच्या स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन मुंबईत करण्यात आलं होतं. यावेळी सीरिजमधील कलाकार आणि इंडस्ट्रीतील इतरही काही सेलिब्रिटी उपस्थित होते. या सगळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं. वयाच्या 64 व्या वर्षी नीना गुप्ता यांचा ग्लॅमरस अंदाज पाहून सर्वजण थक्क झाले होते. स्क्रीनिंगला जाण्यापूर्वी त्यांनी पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
‘पंचायत 3’मध्ये नीना गुप्ता या मंजू देवीच्या भूमिकेत आहेत. सीरिजमध्ये गावच्या महिलेची भूमिका साकारणाऱ्या नीना खऱ्या आयुष्यात मात्र फारच ग्लॅमरस अंदाजात दिसल्या. यावेळी त्यांनी पांढऱ्या रंगाचा को-ऑर्ड सेट घातला होता. त्यावर त्यांनी गोल्ड नेकलेस आणि लाल रंगाचा बॅग घेतला होता. पिवळ्या रंगाचे स्नीकर्स आणि सनग्लासेस असा त्यांचा हटके लूक चांगलाच चर्चेत होता. नीना यांचा संपूर्ण लूक लक्षवेधी ठरला होता. वयाची साठी ओलांडलेल्या नीना यांचा बोल्ड लूक काहींना पसंत पडला, तर काहींनी त्यावरून ट्रोल करण्यास सुरुवात केली.
‘उर्फी जावेदची आजी’ असं एकाने लिहिलं. तर ‘वयाला अनुसरून कपडे परिधान केले पाहिजेत’, असं दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय. काहींनी नीना यांचं कौतुकसुद्धा केलं. ‘महिला जेव्हा स्वत:ची काळजी घेतात आणि समाजाचा फारसा विचार करत नाहीत, तेव्हा त्या अधिक खुलून दिसतात’, असं एका युजरने लिहिलं आहे. तर ‘त्यांनी फक्त शॉर्ट्स आणि शर्ट घातला आहे. यात काहीच चुकीचं नाही’, अशी बाजू दुसऱ्याने घेतली. नीना यांची मुलगी मसाबा गुप्ता ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. या दोघी मायलेकींना अनेकदा विविध कार्यक्रमांमध्ये ग्लॅमरस अंदाजात पाहिलं जातं. ‘पंचायत 3’मध्ये नीना गुप्ता यांच्याशिवाय जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, चंदन रॉय आणि फैसल मलिक यांच्याही मुख्य भूमिका आहेत.