मुंबई : आई होणं प्रत्येक स्त्रीसाठी सर्वात वेगळा आणि आनंददायी अनुभव असतो. पण एका प्रसिद्ध अभिनेत्रीला आई झाल्यानंतर अनेक संकटांचा सामना करावा लागला. ही प्रसिद्ध अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री नीना गुप्ता आहेत. एककाळ असा होता जेव्हा नीना गुप्ता वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटर विवियन रिचर्डसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. त्यांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव मसाबा असं आहे. विवियन रिचर्डसोबत विभक्त झाल्यानंतर नीना यांनी सिंगल मदर म्हणून लेकीचा सांभाळ केला. आता विवियन आणि नीना विभक्त झाले असले, तर त्या त्यांच्या आयुष्याबद्दल स्पष्टपणे सांगतात.
आजही कोणत्याही मुलाखतीत नीना यांना लव्हस्टोरी, ब्रेकअप आणि प्रग्नेंसीबद्दल प्रश्न विचारले जातात. नुकताच एका मुलाखतीत नीना यांनी आयुष्यात आलेल्या चांगल्या-वाईट अनुभवांबद्दल सांगितलं आहे. ‘आयुष्यात प्रचंड आनंद होता, पण सोबतच दुःख देखील होतं. मसाबा आयुष्यात असल्यामुळे मी प्रचंड आनंदी होती.’
‘लग्नाआधी आई झाल्यामुळे लोकांनी माझं आयुष्य दयनीय केलं होतं. म्हणून मी घरातच राहायची. बाहेर मी माझ्या बाळासोबत फिरू देखील शकत नव्हते. तेव्हा मी स्वतःला समजवायची लोक वाईट नसतात. जे क्षण आनंददायी असायचे ते मी जगायची.’
नीना गुप्ता १९८८ साली लग्नाआधी आई झाल्या होत्या. नीना आणि विवियन रिलेशनशिपमध्ये होते. पण विवियन विवाहित असल्यामुळे त्यांनी नीना यांच्यासोबत लग्न केलं नाही. त्यांनी नीना यांच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला आणि बाळाला जन्म देण्याची जबाबदारी नीना यांच्यावर सोपवली.
विवियन यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर त्यांनी मसाबाला जन्म दिला. त्यानंतर त्यांनी मसाबाचं ‘सिंगल मदर’ म्हणून सांभाळ केला. आज मसाबा एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तर दुसरीकडे नीना यांनी सीए विवेक मेहरा यांच्यासोबत २००८ साली लग्न केलं. नीना आज पतीसोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत.