मुंबई : 80 च्या दशकात हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री नीना गुप्ता यांनी नुकतंच ट्रोलर्सचं तोंड बंद केलं आहे. नीना यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत हिंदी भाषेची खिल्ली उडवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. हल्ली देशात असे असंख्य लोक आहेत ज्यांना हिंदी बोलताना लाज वाटते. तर काहींना हिंदी बोलता किंवा लिहिताही येत नाही. अनेकदा हिंदी बोलणाऱ्यांना कमी लेखलं जातं. अशा लोकांसाठी नीना गुप्ता यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘खबरदार हिंदी मीडियम म्हणाल तर..’ असा थेट इशाराच त्यांनी टीकाकारांना दिला आहे.
या व्हिडीओमध्ये त्या म्हणाल्या, “एका विषयावर मला बऱ्याच दिवसांपासून बोलायचं होतं. आज मी या सुंदर जागी त्याबद्दल बोलते. आपल्या देशात काही टर्म्स असतात. जसं की, अरे ही तर टीव्ही अभिनेत्री आहे, या टीव्ही अभिनेत्रींना पहा.. अभिनेता किंवा अभिनेत्री. एक टर्म असते की ही तर हिंदी मीडियम आहे. एक टर्म असते की हाताने जेवतेय, काय यार ही हाताने जेवतेय. चमच्याने खात नाही. मला अनेकदा लोक म्हणतात की मी हिंदी मीडियम आहे. कारण मी हिंदी चांगली बोलते आणि ही माझी मातृभाषा आहे. मला हेच बोलायचं आहे की त्याविषयी आपल्याला लाज वाटू नये.”
“मी हिंदी मीडियमची आहे, याचा मला अभिमान आहे. मी जशी जेवते, जसे कपडे परिधान करते, ते मला आवडतं आणि त्यावर मला गर्व आहे. मला टीव्ही अभिनेत्री म्हणून कोणी ओळखत असेल तरी मला गर्व आहे. मी एक अभिनेत्री आहे, मग मी टेलिव्हिजनवर काम करत असो किंवा चित्रपटात”, असं त्या पुढे म्हणाल्या.
हिंदी भाषेविषयी नीना पुढे म्हणतात, “आपण अनेकदा थोडंसं रागावतो आणि हिंदी मीडियमला किंवा स्वत:ला कमी लेखू लागतो. पण तुम्ही कमी लेखू नका. आपण जे करतोय ते योग्य करतोय अशी भावना मनात असेल तर स्वत:वर गर्व करा. मी ठीक बोलतेय ना?”
या व्हिडीओवर सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींकडूनही विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘तुम्ही योग्य म्हणालात. या सेलिब्रिटींना असं वाटतं की त्यांच्या मुलांनी हिंदी चित्रपटांमध्ये काम करायला पाहिजे, पण ते स्वत: घरी इंग्रजीत बोलतात’, असं एकाने लिहिलंय. तर ‘अगदी खरं बोललात तुम्ही. जर आपण हिंदीत बोललो, तर का कमी लेखलं जातं? जर कोणी इंग्रजी चुकीचं बोलत असेल तर त्याची खिल्ली उडवली जाते. पण तोडकं मोडकं हिंदी बोलणं फॅशन मानलं जातं’, असं दुसऱ्याने म्हटलंय.