Neetu Kapoor Dance Video : प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor ) सध्या खुलेपणाने त्यांच्या आयुष्याचा आनंद लुटत आहेत. नीतू कपूर बर्याचदा पार्टी आणि इव्हेंट्समध्ये मस्ती करताना दिसतात. तसेच एका डान्स रिॲलिटी शोमध्ये नीतू कपूर या जजची भूमिका साकारत आहे. आता नीतू कपूर यांचा एक व्हिडिओ (viral video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या आलिया भट्टच्या RRR या चित्रपटातील नाटू-नाटू (Naatu Naatu song) या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. नीतूसोबत अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे (Padmini kolhapure) यांनीही ताल धरत मस्त डान्स केला.
नीतू कपूर या 64 वर्षांची असल्या तरी त्यांचा फिटनेस आणि एनर्जी आजही बॉलीवूडच्या सौंदर्यवतींना स्पर्धा देत आहे. आलिया भट्ट सध्या मेट गाला इव्हेंटसाठी गेली असून नीतू या मैत्रिणींसोबत पार्टी करत आलियाला चिअर करताना दिसत आहेत. या वयात नीतू कपूर यांचा भन्नाट डान्स पाहून सगळेच वेडे झाले आहेत. त्याचवेळी वयाच्या 57 व्या वर्षी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेही नीतू कपूरसोबत डान्स करत होत्या. त्या दोघींच्या उत्साहाचे सर्वजण कौतुक करत आहेत.
पद्मिनी कोल्हापुरे यांनी हा व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. माझ्या आवडत्या नीतू कपूरसोबत नाटू-नाटूवर नृत्य.. हळूहळू तेथे पोहोचेनच, Instareels, अशी कॅप्शनही त्यांनी लिहीली आहे. नीतू कपूर यांनी ही पोस्ट त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केली आहे आणि लिहिले आहे की त्यांनी जुन्या मैत्रिणीसोबत नाटू-नाटूवर सर्वोत्तम प्रयत्न केला. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या अनेक कॉमेंट्स येत असून रामचरण आणि ज्युनियर एनटीआरही तुमच्यासमोर अपयशी ठरले आहेत, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.
नीतू कपूर सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतात. त्यांनी अलीकडेच त्याच्या इंस्टाग्रामवर आलिया भट्टच्या मेट गाला 2023 डेब्यूचा फोटो शेअर केला आहे. याशिवाय ऋषी कपूर यांच्या जयंतीनिमित्त आठवून अभिनेत्री भावूक झाल्या होत्या. नीतू कपूर या वयातही त्यांचे सौंदर्य आणि फिटनेसबाबत खूप सजग आहेत.