मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेते ऋषी कपूर आज आपल्यात नाहीत. त्यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. ऋषी कपूर यांनी ३० एप्रिल २०२० मध्ये अखरेचा श्वास घेतला. ऋषी कपूर यांच्या निधनामुळे कुटुंबासह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. कपूर कुटुंबाच्या कोणत्याही कार्यक्रमात आजही सदस्यांना त्यांनी कमी भासते. आज ऋषी कपूर यांच्या पुण्यतिथी निमित्त नीतू कपूर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या सर्वत्र नीतू कपूर यांच्या पोस्टची चर्चा रंगत आहे. ऋषी कपूर यांच्यासोबत एका खास फोटो शेअर करत नीतू कपूर भावुक झाल्या आहेत. शिवाय कॅप्शनमध्ये नीतू यांनी ऋषी कपूरसाठी मेसेज लिहिला.
नीतू कपूर यांनी ऋषी यांच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये, ‘आश्चर्यकारक आनंदी आठवणींसह तुमची दररोज आठवण येते…’ असं लिहिलं आहे. त्यांच्या पोस्टवर चाहत्यांनी देखील भावना व्यक्त केली आहे. चाहते कमेंटच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त करत आहे. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर ऋषी कपूर यांचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट आठवणी ताज्या केल्या आहेत.
ऋषी कपूर यांचं 30 एप्रिल 2020 रोजी निधन झालं. ल्यूकेमिया अर्थात रक्ताच्या कर्करोगावरील उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गिरगाव भागात असलेल्या ‘सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन’ हॉस्पिटलमध्ये सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 67 व्या वर्षी ऋषी कपूर काळाच्या पडद्याआड गेले.
ऋषी कपूर यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीसह, राजकीय क्षेत्र, क्रिडा विश्वातून हळहळ व्यक्त केली. मुंबई पोलिसांनीही अनोख्या पद्धतीने ट्विट करत ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली होती. ऋषी कपूर यांनी जवळपास 120 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. गेल्या 45 वर्षांहून अधिक काळ त्यांनी सिनेसृष्टीत गाजवला होता. 2008 मध्ये फिल्मफेअर लाइफटाइम अचिवमेंट पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं होतं.
ऋषी कपूर यांनी 1970 साली प्रदर्शित झालेल्या ‘मेरा नाम जोकर’ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉबी’ सिनेमाने ऋषी कपूर यांना खरी ओळख मिळवून दिली. बॉबी सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.