मुंबई | 21 ऑक्टोबर 2023 : या वीकेंडला ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणता चित्रपट किंवा कोणती वेब सीरिज पहावी असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? नेटफ्लिक्सवर सध्या कोणता चित्रपट ट्रेंडिंगमध्ये आहे? या प्रश्नांदरम्यान वीकेंड आणि दसऱ्याचा सुट्टी दिवस जवळ आला आहे. एंटरटेन्मेंटसाठी तुम्ही जर एखादा चित्रपट शोधत असाल तर नेटफ्लिक्सवरील या नव्या क्राइम थ्रिलरला तुम्ही पाहिलंच पाहिजे. कारण गेल्या सलग तीन आठवड्यांपासून ती पहिल्या क्रमांकावर आहे. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावरही या चित्रपटाविषयी चर्चा सुरू झाली आहे.
नेटफ्लिक्सने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये सांगितलं गेलंय की ‘रेप्टाइल’ हा नवीन क्राइम थ्रिलर चित्रपट गेल्या तीन आठवड्यांपासून पहिल्या क्रमांकावर आहे. यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ज्यांनी हा चित्रपट पाहिला, तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कौतुक करत आहेत. ‘हा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘दमदार अभिनेता’ अशा शब्दांत दुसऱ्या युजरने प्रशंसा केली.
‘रेप्टाइल’ या चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास, 7 सप्टेंबर रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. एका तरुण रियल इस्टेट एजंटच्या हत्येपासून या चित्रपटाच्या कथेला सुरुवात होते. त्यानंतर एक डिटेक्टिव्ह या हत्येमागील सत्याचा शोध घेत असतो. हळूहळू चित्रपटाची कथा पुढे जाते आणि त्याच प्रवासात तो त्याच्या आयुष्याशी संबंधित काही भ्रमावरूनही पडदा उचलतो. ग्रांट सिंगरने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून यामध्ये बेंशियो डेल टोरो, अलिशिया सिल्वरस्टोन आणि जस्टिन टिंबरलेक यांच्या मुख्य भूमिका आहेत.
या चित्रपटात बेंशियो डेल टोरोने टॉम निकोल्स नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तो त्याच्या कामात चोख असतो. मात्र जेव्हा त्याला त्याच्या जवळच्या व्यक्तींची निवड करून केस सोडवायची असते, तेव्हा तो विचित्र निर्णय घेतो. चित्रपटात टॉमच्या पत्नीची भूमिका अलिशिया सिल्वरस्टोनने साकारली आहे. तर जस्टिन टिंबरलेक हा पीडितेच्या बॉयफ्रेंडच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात कथेत अनेक रंजक ट्विस्ट आहेत.