लोकप्रिय गायक जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पण यावेळी तो त्याच्या गाण्यामुळे नाही तर एका कॉन्सर्टच्या (Concert) पोस्टरमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. जुबिनच्या या पोस्टरवरून गदारोळ झाला असून त्याच्या अटकेची मागणी होत आहे. #ArrestJubinNautyal असा हॅशटॅग शनिवारपासून ट्विटरवर ट्रेंड करत आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर जुबिन नौटियालची प्रतिक्रिया समोर आली आहे.
अमेरिकेत होणाऱ्या जुबिनच्या लाइव्ह कॉन्सर्टचं पोस्टर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टरबाबत दावा केला जात आहे की, कॉन्सर्टचा आयोजक जयसिंग हा भारताचा वॉन्टेड गुन्हेगार आहे. त्याचवेळी काही युजर्स म्हणत आहेत की हा जयसिंग नसून रेहान सिद्दीकी आहे. तर काहींनी जयसिंगवर खलिस्तानचं समर्थन केल्याचा आरोप केला आहे. ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या जुबिनच्या कॉन्सर्टचं हे पोस्टर त्याच्यासाठी अडचणीचं ठरलं आहे.
आता जुबिन नौटियाल याने ट्विट करून लोकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असं सांगितलं आहे. ‘हॅलो फ्रेंड्स आणि ट्विटर फॅमिली. पुढच्या महिन्यात मी प्रवास आणि शूटिंगमध्ये व्यस्त असेन. कोणत्याही प्रकारच्या अफवांमुळे निराश होऊ नका. मला देशावर प्रेम आहे. मी तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करतो’, असं ट्विट त्याने केलंय.
Hello friends and twitter family, I’ve been travelling and will be shooting for the next whole month. Don’t get upset on rumours. I love my country ????. I love you all ? pic.twitter.com/0Peyy74rwr
— Jubin Nautiyal (@JubinNautiyal) September 10, 2022
सोशल मीडियावरील या सर्व गोंधळानंतर जुबिन नौटियालने आपला अमेरिका दौरा रद्द केल्याचं म्हटलं जात होतं. मात्र त्याच्या मॅनेजरने ही बातमी अफवा असल्याचं म्हटलं आहे. ‘मी हे स्पष्ट करू इच्छितो की अमेरिकेचा दौरा खूप आधीच रद्द करण्यात आला होता. कृपया अशा अफवांकडे लक्ष देऊ नका. जय हिंद’, अशी पोस्ट जुबिनच्या मॅनेजरने इन्स्टाग्रामवर लिहिली होती.
काही नेटकरी याप्रकरणी गायक अरिजित सिंगवरही टीका करत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की अरिजितने जय सिंह नावाच्या व्यक्तीसोबत शोदेखील केला आहे. मात्र अरिजितने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.