मुंबई : 27 नोव्हेंबर 2023 | झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स 2023’चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. कोपरगावची गौरी पगारेनं विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. मात्र गौरीच्या विजयाने काही नेटकरी नाखुश आहेत. सोशल मीडियावर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. संगीतापेक्षा अधिक भावनिक गोष्टींना पाठिंबा देऊन वाहिनीने गौरीला जिंकवलं, असा आरोप काहींनी केला आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चा महाअंतिम सोहळा शनिवारी 25 नोव्हेंबर रोजी पार पडला. यावेळी मुंबईची श्रावणी वागळे, गोव्याचा हृषिकेश ढवळीकर, जयेश खरे, देवांश भाटे, गीत बागडे आणि कोपरगावची गौरी अलका पगारे या सहा स्पर्धकांमध्ये अंतिम चुरस रंगली होती.
‘शोमध्ये पक्षपात झालाय’, असं एकाने लिहिलंय. तर ‘जय आणि श्रावणी हे गौरीपेक्षा चांगले गातात’, असं मत दुसऱ्या युजरने नोंदवलं आहे. ‘सहानुभूती आणि गरीबाची जाण यातून हा पुरस्कार दिला आहे. गौरी चांगली गाते यात काही शंका नाही. पण बाकी कलाकारांचा विचार केला तर हा अयोग्य निर्णय आहे’, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. ‘परिस्थितीवरून विजेती निवडणं योग्य नाही’, असंही काहींनी म्हटलंय. यावेळी पारितोषिक म्हणून गौरीला दीड लाख रुपयांचा धनादेश आणि चांदीची वीणा देण्यात आली. तर उपविजेत्या ठरलेल्या श्रावणी वागळे आणि जयेश खरेला प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
विजेतेपद पटकवल्यावर आनंद व्यक्त करताना गौरी म्हणाली, “मला खूप आनंद होतोय की मला सारेगमप लिटिल चॅम्प्स 2023 चा किताब मिळाला. माझ्याकडे शिक्षण नसतानाही मी इतक्या उंचावर पोहोचली. माझ्या या यशात गुरुजी सुरेश वाडकर, सलील दादा आणि वैशाली ताई यांची खूप मेहनत आहे. मी विजेतेपद मिळवलं यात त्यांचं श्रेय आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे आणि झी मराठीचे मी खूप आभार मानते. माझ्या आईने खूप मेहनत घेतली आहे, म्हणूनच मी इथवर पोहोचू शकले.”
महाअंतिम सोहळ्यात पोहोचलेल्या सर्वच स्पर्धकांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर केली होती. मात्र या सगळ्यात विजेती गौरी अलका पगारे, प्रथम उपविजेती मुंबईची श्रावणी वागळे आणि द्वितीय उपविजेता जयेश खरे यांनी विशेष छाप सोडली. मृण्मयी देशपांडे हिच्या सूत्रसंचालनाने या पर्वाला अजूनच बहार आली आणि हा महाअंतिम सोहळादेखील अगदी दिमाखात पार पडला.