दार उघड वहिनी म्हणत महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण भारतातील तमाम वहिनींचा पैठणी देऊन आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) भाऊजी आणि होम मिनिस्टर (Home Minister) हा कार्यक्रम गेली १८ वर्षे सन्मान करत आला आहे. आता होम मिनिस्टरचं महामिनिस्टर हे नवीन पर्व 11 एप्रिल पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्यात बांदेकर भाऊजी विजेत्या वहिनीला चक्क 11 लाख रुपयांची पैठणी (Paithani Saree) देणार आहेत. ही पैठणी कशी आहे, हे दाखवणारा प्रोमो नुकताच झी मराठी वाहिनीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. 11 लाखांची ही पैठणी साडी हिरेजडीत असून त्याला खऱ्या सोन्याची झरी आहे. मात्र या नव्या प्रोमोवरून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 11 लाखांच्या पैठणीवरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया मांडल्या आहेत.
’11 लाखांची पैठणी नेसून कोणाला मिरवायचं आहे, त्यापेक्षा जिथे गरज आहे तिथे ते पैसे वापरा. लोकांना सध्या पैशांची गरज आहे. अनेक गावांत पिण्यासाठी पाणीसुद्धा नाही. उन्हाळ्यामुळे लोकांचे हाल होतायत. तुम्ही त्यांची मदत करा’, अशा शब्दांत एका नेटकऱ्याने सुनावलं. आणखी एका युजरने 11 लाखांच्या एका पैठणीऐवजी 11 लाख गरीब महिलांना साध्या साड्या वाटा, असाही सल्ला दिला. एका नेटकऱ्याने साडीवरून चिंता व्यक्त केली. ‘बापरे.. कोणी चोरली तर? किंवा एखाद्याने रस्त्यावर चालताना हल्ला केला तर’, असा प्रश्न त्याने विचारला. काहींनी बांदेकरांना 11 लाख रुपये रोख रक्कम देण्याचाही पर्याय सुचवला आहे. एका युजरने वयोमर्यादेवरून नाराजी व्यक्त केली. ’21 ते 50 वर्षे अशी वयोमर्यादा का आहे? एखाद्याचं लग्न झालं नसेल आणि तरीही स्पर्धेत भाग घ्यायचं असेल तर काय करावं? प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे’, असं त्याने लिहिलं.
आदेश बांदेकर यांनी ‘होम मिनिस्टर’ निवडण्यासाठी फक्त महाराष्ट्रच नाही तर देशभ्रमंती देखील केली आणि गेल्या अनेक वर्षांपासून देशातील कानाकोपऱ्यातून महिलांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला आहे. महामिनिस्टर या नव्या पर्वात ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात पैठणीचा खेळ खेळणार आहेत. विजेत्या वहिनींना महामिनिस्टरचा किताब आणि ११ लाख रुपयांची सोन्याची जरी असलेली पैठणी मिळणार आहे.
हेही वाचा:
‘यालाच मिक्स बिर्याणी म्हणतात’; हृतिक-सबा आणि सुझान-अर्सलानच्या एकत्र फोटोवर नेटकऱ्यांचे कमेंट्स