‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. यंदाच्या सिझनमध्येही पहिल्या दिवसापासून घरात दोन गट पडले. नुकत्याच पार पडलेल्या टास्कमध्ये निक्की तांबोळी आणि तिच्या टीमने बाजी मारली. मात्र चुकीचं वागून तुम्ही विजेते ठरलात, असा आरोप टीम बीकडून करण्यात आला आहे. छोट्या पाहुण्यांना सांभाळण्याचा हा टास्क होता. टास्क संपताच अभिजीत सावंतने संताप व्यक्त केला. “निक्कीने आमच्या बाहुलीला इजा पोहोचवली, पाय तोडला. आपण आपल्या बाळांची काळजी अशी घेतो का”, असा सवाल त्याने केला. यादरम्यान निक्कीने पुन्हा एकदा दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली. निक्कीच्या वक्तव्यावरून नेटकरीसुद्धा भडकले आहेत. वर्षा उसगांवकरांच्या मातृत्वाबद्दल बोलणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न नेटकऱ्यांनी केला आहे.
टास्कदरम्यान निक्की बी टीमच्या सदस्यांच्या बाहुलीचा एक पाय तोडते. ते पाहून वर्षा म्हणतात, “निक्कीने बाहुलीची मुंडीच काय, तंगडंही तोडलंय.” त्यावर प्रतिक्रिया देत निक्की म्हणाली, “यांच्या भावना बघितल्या का? आईचं प्रेम यांना कसं समजेल. जाऊ दे!” निक्कीच्या तोंडून हे वाक्य ऐकताच अंकिता भडकते. ती निक्कीला सुनावते, “ए.. तुझं हे बोलणं अत्यंत चुकीचं आहे. हा मानवी भावनांचा खेळ आहे, असं बिग बॉस म्हणाले. तू वर्षा मॅमना जे बोलतेय, ते सहन करणार नाही. त्यांच्या मातृत्वावर जाऊ नकोस.” निक्कीसुद्धा अंकिताला प्रत्युत्तर देत म्हणते, “त्या स्वत:च तंगडं तोडलं असं म्हणाल्या आणि मला भावनांबद्दल सांगतायत. तू मला शिकवू नकोस.” निक्कीच्या अशा बोलण्याने वर्षा उसगांवकर दुखावल्या जातात. “तू जे केलंस तेच मी सांगितलं. शब्द हे बाणासारखे असतात. ते परत घेता येत नाहीत, हे लक्षात ठेव. एकदा बाण गेला की गेला”, असं त्या निक्कीला म्हणतात. या वादानंतर जान्हवी, पंढरीनाथ हे स्पर्धकसुद्धा निक्कीच्या वागण्याला चुकीचं ठरवतात.
टास्कदरम्यान घडलेल्या या सर्व प्रकरणाबद्दल नंतर निक्की अरबाजशी बोलू लागते. ती त्याला म्हणते, “त्यांना मुलं नाहीत, हे मला माहीत नव्हतं. धनंजय सरांनी मला केव्हातरी सांगितलं होतं. टास्कदरम्यान त्यासुद्धा मला ‘काळ्या मनाची आई’ असं म्हणाल्या होत्या. मलासुद्धा त्याचा राग आला होता. बाळाच्या तंगड्या तोडल्या असं म्हणत त्या माझ्यावर हसल्या. ते ऐकून मलाही राहावलं नाही. एका आईचं प्रेम काय असतं, हे तुम्हाला काय माहित, असं मी थेट म्हटलं. रागाच्या भरात माझ्या तोंडून हे शब्द निघाले होते.”
दुसऱ्या दिवशी किचनमध्ये काम करताना निक्की ही वर्षा यांची माफी मागते. “मी काल जे काही बोलले त्यासाठी माफी मागते. मला वाईट वाटलं होतं. तुमच्याशी कसं बोलू हे समजत नव्हतं. मी आईबद्दल जे काही बोलले त्यासाठी मनापासून सॉरी”, असं निक्की म्हणते. त्यावर वर्षा तिला म्हणतात, “तू जे बोललीस ते अक्षम्य आहे. पण ठीके.”
या एपिसोडनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी निक्कीविषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘वर्षाताईंच्या मातृत्वाबद्दल असं वक्तव्य करणं अत्यंत चुकीचं आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘निक्कीला घरातून हाकलून द्या. तिने आता हद्दच पार केली आहे’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे. ‘स्वत: एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीला मातृत्वाबद्दल असं बोलणं कितपत योग्य आहे’, असाही सवाल नेटकऱ्यांनी केला.