‘चला हवा येऊ द्याची जागा कोणीच..’; निलेश साबळेंच्या नव्या शोवर कमेंट्सचा वर्षाव

| Updated on: Apr 04, 2024 | 8:09 AM

डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे विनोदाचे तीन हुकमी एक्के एकत्र येत पुन्हा एकदा नव्या जोशात, नव्या जल्लोषात विनोदाची चौफेर आतषबाजी करायला सज्ज झाले आहेत. कलर्स मराठी वाहिनीवर त्यांचा नवीन कॉमेडी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चला हवा येऊ द्याची जागा कोणीच..; निलेश साबळेंच्या नव्या शोवर कमेंट्सचा वर्षाव
भाऊ कदम, निलेश साबळे, ओंकार भोजने
Image Credit source: Instagram
Follow us on

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या सर्वांत लोकप्रिय कार्यक्रमाने गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मात्र गेल्या महिन्यात या कार्यक्रमाने निरोप घेत सर्वांनाच मोठा धक्का दिला. ‘चला हवा येऊ द्या’ बंद झाल्यानंतर काही दिवसांनी आता डॉ. निलेश साबळे यांनी नव्या शोची घोषणा केली आहे. भाऊ कदम, ओंकार भोजने यांच्यासह निलेश साबळे कलर्स मराठी वाहिनीवर नवा शो घेऊन येत आहेत. ‘हसताय ना, हसायलाच पाहिजे’ असं त्यांच्या या नव्या शोचं नाव आहे. या कॉमेडी शोचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र त्यावर नेटकऱ्यांकडून आणि ‘चला हवा..’च्या चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या प्रोमोमध्ये निलेश साबळे, ओंकार भोजने आणि भाऊ कदम हे तिघं एकमेकांकडे पाहून हसताना दिसत आहेत.  त्यानंतर ते काही हातवारे करतात आणि कलर्स मराठी वाहिनीवर हा शो येणार असल्याचं दाखवतात. या प्रोमोच्या कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी ‘चला हवा येऊ द्या’ आणि ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमांचा उल्लेख केला आहे. ‘पण चला हवा येऊ द्या हे इमोशन होतं’, असं एकाने म्हटलंय. तर ‘कोणताच कार्यक्रम चला हवा येऊ द्याची जागा घेऊ शकत नाही’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. ‘चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात काहीतरी राडा झालेला दिसतोय. म्हणूनच सर्व कलाकार वेगवेगळे शो करताना दिसत आहेत’, असाही अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे. तर दुसरीकडे कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनची मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा

कलर्स मराठी वाहिनीवर ‘बिग बॉस मराठी’ हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येतो. त्याचाही मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे आता ‘हसताय ना, हसायलाच पाहिजे’ या नव्या कार्यक्रमाच्या घोषणेनंतर ‘बिग बॉस मराठी’चा नवीन सिझन रखडणार का, असा प्रश्न चाहत्यांमध्ये उपस्थित झाला आहे. ‘कृपया बिग बॉस मराठी’चा नवीन सिझन चालू करा, अशी विनंती करणारे अनेक कमेंट्स पहायला मिळत आहेत.

‘हसताय ना, हसायलाच पाहिजे’ या कार्यक्रमाचं लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार आहे. यात भाऊ कदम, ओंकार भोजने यांच्याशिवाय सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण हे कलाकार त्यांना साथ देणार आहेत. तर महाराष्ट्राचे कॉमेडी किंग आणि अत्यंत संवेदनशील गुणी अभिनेते भरत जाधव आणि चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल आठल्ये हे दर भागामधे सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.