अलिबाग | 3 ऑगस्ट 2023 : सुप्रसिद्घ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी देसाई यांनी एका व्हॉइस रेकॉर्डरमध्ये आपलं मनोगत मांडलं होतं. त्यात त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे, याचा तपशील समोर येत आहे. नितीन देसाई यांचे 11 ऑडिओ क्लिप्स पोलिसांच्या हाती लागले आहेत. या रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी सर्वप्रथम लालबागचा राजाला अखेरचा नमस्कार असं म्हटलं आहे. दरवर्षी ते लालबागचा राजासाठी सुंदर देखावा निर्माण करायचे. यावर्षीही त्यांनी मंडपाचं काम हाती घेतलं होतं. त्याचे काही फोटोसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओचा ताबा कर्ज देणाऱ्या कंपनीला देऊ नका, अशी विनंती रेकॉर्डिंगमध्ये केली आहे.
कर्ज देणाऱ्या कंपनीला एनडी स्टुडिओचा ताबा देऊ नये. त्याऐवजी राज्य सरकारनं स्टुडिओचा ताबा घेऊन त्याची देखभाल करावी, अशी विनंती देसाई यांनी त्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी ही विनंती केली आहे.
चौक इथल्या एनडी स्टुडिओमध्ये मंगळवारी रात्री आल्यानंतर देसाई यांनी त्यांच्या एका कर्मचाऱ्याला बोलावून सकाळी हा रेकॉर्डर काही व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना केल्या. बुधवारी सकाळी तोच कर्मचारी त्यांना भेटायला गेला असता त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत देसाई यांचा मृतदेह आढळला. त्यांचा व्हॉईस रेकॉर्डर शेजारी पडला होता.
नितीन देसाई यांच्या एनडीज आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडने एडेलवाईज समूहातील ईसीएल फायनान्सकडून 2016 आणि 2018 असे दोन टप्प्यांत एकूण 181 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं गोतं. 31 मार्च 2022 आणि 9 मे 2022 अशा अनुक्रमे या दोन मुदत कर्जाच्या परतफेडीच्या अंतिम तारखा होत्या. त्या पाळल्या न गेल्याने कर्ज बुडीत खात्यात अर्थात एनपीए म्हणून वर्ग केलं होतं.
मयूर ठोंबरे यांनी नितीन देसाई यांना सर्वांत आधी पाहिलं होतं. ठोंबरे हे एनडी स्टुडिओमधील बांधकामाचं कंत्राट घ्यायचे. घटनेनंतर त्यांना कॉल आला आणि जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा देसाई यांनी गळफास घेतला होता. “स्टुडिओतील मराठी पाऊल पडते पुढे या चित्रपटाच्या सेटवर देसाई यांनी दोरखंडाने धनुष्यबाण बनवला होता. त्याच्याच मध्यभागी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली”, अशी माहिती ठोंबरे यांनी दिली.