70 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा 8 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये पार पडला. देशातील अनेक भाषांमधील चित्रपटांचा गौरव या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात होतो. या पुरस्कार सोहळ्याला सर्व विभागातील पुरस्कार विजेत्यांची उपस्थिती होती. मात्र सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट विभागात पुरस्कार पटकावलेल्या ‘वाळवी’ चित्रपटाचा एकही प्रतिनिधी तिथे उपस्थित नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार किंवा लेखक यापैकी कुणीही या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित नव्हतं. याप्रकरणी चित्रपटाच्या लेखिका आणि सहनिर्मात्या मधुगंधा कुलकर्णी यांनी एका मुलाखतीत अनुपस्थित राहण्यामागचं कारण सांगितलं.
“राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी होण्याची आणि तो पुरस्कार स्वीकारण्याची माझी खूप इच्छा होती. त्यासाठी मी सातत्याने झी स्टुडिओकडे पाठपुरावा केला. त्यांना मी यासंदर्भात तीसहून अधिक ई-मेल्स पाठवले होते. परंतु त्यांच्या अधिकाऱ्यांकडून मला सकारात्मक उत्तर मिळालं नाही. चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून परेश मोकाशी यांना सोहळ्याचं आमंत्रण होतं. पण सध्या ते शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने तिथे उपस्थित राहू शकले नाहीत. वाळवी या चित्रपटाची लेखिका आणि सहनिर्माती म्हणून मला पुरस्कार सोहळ्याला हजर राहण्यासाठी झी स्टुडिओच्या निर्मात्यांनी सहकार्य केलं नाही. त्यांनी माझ्या भावनेचा अनादर तर केलाच पण स्वत:ही राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याला अनुपस्थित राहून त्याचा सन्मान ठेवला नाही. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे”, असं त्या म्हणाल्या.
‘वाळवी’ला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मधुगंधा कुलकर्णी यांनी झी स्टुडिओच्या समन्वयकांशी वारंवार संपर्क साधला होता. सुरुवातील दिग्दर्शक म्हणून परेश मोकाशी कार्यक्रमाला उपस्थित राहतील, असं उत्तर व्यवस्थापनाकडून मिळालं. मात्र पुरस्कार वितरणाची तारीख जवळ येऊ लागताच थातूरमातूर उत्तर देण्यात आलं, असं मधुगंधा म्हणाल्या.
“राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान राखला गेला पाहिजे. वाटल्यास मी स्वखर्चाने दिल्लीला जाईन, असाही ईमेल झीच्या व्यवस्थापकांना पाठवलं होतं. मात्र त्यांच्याकडून प्रतिसादच मिळाला नाही. झीतर्फे आमचे प्रतिनिधी हजर राहतील, असं त्यांनी कळविलं होतं. त्यासंदर्भात आठवण करून दिली असता, ‘आज हमारी हिंदी के प्रोजेक्ट के बारे में मीटिंग है’ असं उत्तर दिलं”, अशी तक्रार मधुगंधा यांनी केली. याप्रकरणी अद्याप झी स्टुडिओकडून कोणतंही उत्तर मिळालेलं नाही.