नवी दिल्ली: सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात नवीन वळण आलं आहे. या प्रकरणात आता बॉलिवूडच्या दोन अभिनेत्री एकमेकांसमोर आल्या आहेत. अभिनेत्री नोरा फतेहीने दिल्ली कोर्टात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि काही मीडिया कंपन्यांविरोधात मानहानीचा दावा केला आहे. 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात जाणूनबुजून आपलं नाव घेतलं जात असल्याचा आरोप नोराने केला.
‘सुकेशसोबत माझे थेट कोणतेही संबंध नव्हते. मी लीना मारिया पॉलच्या माध्यमातून त्याला ओळखत होती. मी त्याच्याकडून कोणत्याच भेटवस्तूदेखील स्वीकारल्या नाहीत. मात्र मीडिया ट्रायलमुळे माझ्या प्रतिमेला धक्का पोहोचतोय,’ असं नोरा म्हणाली.
मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या निशाण्यावर जॅकलिन आणि नोरा या दोघीही आहेत. अनेकदा या दोघांची चौकशी ईडीकडून झाली. नोरावरही सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याच आरोप आहे. मात्र चौकशीदरम्यान नोराने हे आरोप फेटाळले. सुकेशने नोराचा भावोजी बॉबीला 65 लाख रुपयांची BMW कार भेटवस्तू दिल्याचं म्हटलं जात होतं.
चौकशीत असं समोर आलं की सुकेशने BMW कारची ऑफर नक्कीच दिल्ली होती. मात्र नोराने ती ऑफर नाकारली. नोराला सुरुवातीपासूनच या डीलवर संशय होता. तरीही त्यानंतर सुकेश तिला सतत फोन करत होता. काही काळानंतर नोराने सुकेशचा नंबर ब्लॉक केला होता.
नोराने ईडीच्या चौकशीदरम्यान सांगितलं होतं की सुकेश चंद्रशेखर याच्याशी तिची भेट एका कार्यक्रमात त्याची पत्नी लीनामार्फत झाली होती. लीनाने नोराला गुच्ची या महागड्या ब्रँडची बॅग आणि आयफोन दिला होता. माझा पती सुकेश हा तुझा खूप मोठा चाहता असल्याचं तिने नोराला सांगितलं होतं. लीनानेच सुकेश आणि नोराची फोनवर चर्चा घडवून आणली होती.
जॅकलिनने कधीच माध्यमांसमोर नोराविषयी कोणतंच वक्तव्य केलं नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने ती तिच्या वक्तव्यांबद्दल प्रचंड काळजी बाळगत होती. त्याचप्रमाणे आम्हाला नोराकडून कोणत्याही प्रकारची मानहानीची नोटीस आलेली नाही. नोटीस मिळाल्यानंतर आम्ही कायदेशीर पद्धतीने त्याला उत्तर देऊ, असं स्पष्टीकरण जॅकलिनच्या वकिलांनी दिली.