मुंबई: ‘देवदूत’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सोनू सूद याच्या प्रत्येक कामाचं नेहमीच चाहत्यांकडून कौतुक झालं. लॉकडाऊनच्या काळात त्याने असंख्य कामगारांची मदत केली. त्यानंतरही त्याने मदतीचा ओघ कायम ठेवला. मात्र आता सोनू सूदने असं काही केलंय, ज्यामुळे त्याचं कौतुक नाही तर त्याला ओरडा बसला आहे. काही दिवसांपूर्वी सोनूने ट्रेनच्या प्रवासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडीओवर आता रेल्वेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
सोनू सूदने 13 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये तो धावत्या ट्रेनच्या फूटबोर्डवर बसून प्रवास करताना पहायला मिळत आहे. ट्रेनच्या दरवाज्याचा हँडल पकडून तो प्रवासाचा आनंद लुटताना या व्हिडीओत दिसतोय. मात्र अशा पद्धतीने प्रवास करणं अनेकांना योग्य वाटलं नाही.
सोनू सूदच्या या व्हिडीओवर उत्तर रेल्वेने प्रतिक्रिया देत अभिनेत्याला फटकारलं आहे. रेल्वेच्या फूटबोर्डवर बसून प्रवास करणं अत्यंत धोकादायक असतं, असं रेल्वेनं सोनू सूदला सांगितलं आहे.
प्रिय, @SonuSood
देश और दुनिया के लाखों लोगों के लिए आप एक आदर्श हैं। ट्रेन के पायदान पर बैठकर यात्रा करना खतरनाक है, इस प्रकार की वीडियो से आपके प्रशंसकों को गलत संदेश जा सकता है।
कृपया ऐसा न करें! सुगम एवं सुरक्षित यात्रा का आनंद उठाएं। https://t.co/lSMGdyJcMO
— Northern Railway (@RailwayNorthern) January 4, 2023
सोनूच्या व्हिडीओला रिट्विट करत उत्तर रेल्वेनं लिहिलं, ‘प्रिय सोनू सूद, देश आणि जगातील लाखो लोकांसाठी तुम्ही एक आदर्श आहात. ट्रेनच्या पायदानावर बसून प्रवास करणं धोकादायक आहे. अशा पद्धतीचा व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे चुकीचा संदेश पसरू शकतो. कृपया तुम्ही असं करू नका. सुरक्षित यात्रेचा आनंद घ्या.’
.@SonuSood travelling on the footboard may be a source of ‘Entertainment’ in movies, not real life! Let’s follow all safety guidelines and ensure a ‘Happy New Year’ for all.
— GRP Mumbai (@grpmumbai) December 14, 2022
जीआरपी मुंबईच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरूनही सोनू सूदवर नाराजी व्यक्त करण्यात आली. ‘सोनू सूदने फूटबोर्डवर बसून प्रवास करणं हे चित्रपटात मनोरंजक वाटू शकतं, पण खऱ्या आयुष्यात नाही. सुरक्षेचे सर्व नियम पाळुयात आणि नवीन वर्ष सर्वांसाठी आनंदी जावो अशी आशा करुयात’, असं ट्विट करत जीआरपी मुंबईनेही सोनू सूदला फटकारलं.