मुंबई | 15 सप्टेंबर 2023 : कलाविश्वातून आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. गुरुवारी अभिनेते रियो कपाडिया यांच्या निधनानंतर आता आणखी एका अभिनेत्याने या जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. प्रसिद्ध अभिनेते सुनील श्रॉफ यांचं निधन झालं आहे. सुनील यांचं निधन कशामुळे झालं, याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र गेल्या काही काळापासून ते आजारी होते, असं समजतंय. नुकतीच त्यांनी अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या ‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. सुनील श्रॉफ यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘OMG 2’चे अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्यासोबतचा फोटोसुद्धा पोस्ट केला होता.
सुनील श्रॉफ हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असायचे. आपल्या आगामी प्रोजेक्ट्सविषयीचे अपडेट्स ते चाहत्यांना द्यायचे. त्याचसोबत ते सतत विविध ब्रँड्ससाठी जाहिरातीसुद्धा करायचे. सुनील यांनी शर्मिला टागोरपासून राधिका मदनपर्यंत अनेक कलाकारांसोबत जाहिरातींमध्ये काम केलं आहे. त्यांनी 17 ऑगस्ट 2022 रोजी इन्स्टाग्रामवर अखेरचा पोस्ट शेअर केला होता. या पोस्टमध्ये ते ईद साजरी करताना दिसत आहेत. ईद मुबारक या गाण्यावर ते आनंदाने नाचताना पहायला मिळत आहेत.
सुनील श्रॉफ यांनी ‘ओह माय गॉड 2’च्या आधी ‘शिद्दत’, ‘द फायनल कॉल’, ‘कबाड द कॉइन’, ‘जुली’, ‘अभय’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटांमध्ये कधी त्यांनी पित्याची तर कधी डॉक्टरची भूमिका साकारत फिल्म इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली.
सुनील श्रॉफ यांचा इन्स्टाग्रामवर ‘श्रॉफ अंकल’ या नावाने अकाऊंट आहे. त्यावर ते आपले विविध आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करायचे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.