मुंबई | 31 जुलै 2023 : अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळे निर्माण झाले आहेत. सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटात सर्वांत मोठा बदल सुचवला गेला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते आणि निर्मितीचा खर्चही आणखी वाढू शकतो. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. ‘OMG 2’मध्ये अक्षय कुमार हा भगवान शंकराची भूमिका साकारतोय. या चित्रपटाचा टीझर आणि त्यातील गाणीसुद्धा प्रदर्शित झाली आहेत. मात्र सेन्सॉर बोर्डाने ‘OMG 2’ला अडल्ट रेटिंग देत त्यातील 20 दृश्यांवर कात्री चालवली आहे. याशिवाय सेन्सॉर बोर्डाने सर्वांत मोठा बदल सुचवला आहे.
सेन्सॉर बोर्डाने दिग्दर्शक अमित राय यांना अक्षय कुमारची शंकराची भूमिकाच बदलण्याचे आदेश दिल्याचं कळतंय. शंकराऐवजी अक्षयला दूत म्हणून दाखवावं, असं सेन्सॉर बोर्डाने सुचवलं आहे. चित्रपटातील काही दृश्यांमध्ये अक्षयला निळ्या रंगात दाखवलं गेलंय. हाच रंग हटवण्याचा आदेश सेन्सॉरने दिला आहे. “सेन्सॉरने सुचवलेल्या बदलांचा चित्रपटावर मोठा परिणाम होऊ शकतो. निर्मात्यांना अनेक सीक्वेन्स बदलावे लागतील तर काही हटवावे लागतील. सेन्सॉरने सांगितलेले सीक्वेन्स त्यांना पूर्ण हटवावे लागतील किंवा अक्षयचा रंग डिजिटल पद्धतीने बदलावा लागेल. कोणताही मार्ग अवलंबला तरी त्यासाठी अधिक वेळ आणि निर्मितीचा खर्च लागणार हे नक्की”, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, निर्माते चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलू शकतात. कारण त्यांना सेन्सॉरच्या समितीने सुचवलेल्या बदलांविरुद्ध लढा द्यायचा आहे आणि चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही वेळ द्यायचा आहे. “सेन्सॉरने सुचवलेल्या कट्सबद्दल चित्रपटाचे निर्माते समाधानी नाहीत. कारण त्यामुळे कथेवर मोठा परिणाम होईल असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाला दिलेल्या ‘अ’ प्रमाणपत्राविषयीही ते खुश नाहीत”, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून झालेल्या वादाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सेन्सॉर बोर्डाने ‘OMG 2’ हा चित्रपट आधीच सुधारित समितीकडे पाठवला होता. इतकंच नव्हे तर देव किंवा धर्म या विषयांशी संबंधित चित्रपट आता सेन्सॉर बोर्डाकडून प्रत्येक वेळी रिव्ह्यू आणि रिव्हिजनसाठी पाठवले जाणार असल्याचं कळतंय. प्रभास आणि क्रिती सनॉन यांच्या भूमिका असलेल्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाला बऱ्याच विरोधाला सामोरं जावं लागलं होतं. इतकंच नव्हे तर अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने या चित्रपटावरून सेन्सॉर बोर्डालाही सुनावलं होतं.