मुंबई : 21 नोव्हेंबर 2023 | बॉलिवूडमध्ये 60 आणि 80 च्या दशकात अशा बऱ्याच अभिनेत्री होऊन गेल्या, ज्यांनी आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयकौशल्याने चाहत्यांची मनं जिंकली. यात अशाही काही अभिनेत्री आहेत, ज्यांना बॉलिवूडमध्ये यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. माला सिन्हा अशाच अभिनेत्रींपैकी एक होती. माला सिन्हा या त्यांच्या काळातील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होत्या. मात्र एका धक्कादायक कबुलीमुळे त्यांचं करिअर उद्ध्वस्त झालं.
माला सिन्हा यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1936 रोजी बंगाली नेपाळी कुटुंबात झाला. करिअरच्या शिखरावर असताना त्यांनी एक मोठी चूक केली आणि त्यानंतर त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली. या घटनेनंतर त्या नैराश्यात गेल्या. इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला होता. करिअरच्या सुरुवातीला त्यांना अनेकदा नकाराला सामोरं जावं लागलं होतं. पण हार न मानता त्यांनी काम सुरू ठेवलं. त्यांनी बंगाली चित्रपटातून करिअरची सुरुवात केली आणि बॉलिवूडमध्ये ‘रंगीत रातें’ या चित्रपटातून पहिलं पाऊल ठेवलं होतं.
माला सिन्हा यांनी ‘प्यासा’, ‘फिर सुबह होंगी’, ‘धूल के फूल’, ‘परवरिश’, ‘उजाला’, ‘माया’, ‘हरियाली और रास्ता’, ‘बेवकूफ’, ‘अनपढ’, ‘बहुरानी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी राज कुमार, राजेंद्र कुमार, बिस्वजित, मनोज कुमार, धर्मेंद्र यांसारख्या मोठमोठ्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केला. एका रिपोर्टनुसार, माला सिन्हा या त्यांच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या आणि सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्री होत्या.
1978 मध्ये करिअरच्या शिखरावर असताना त्यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली होती. यावेळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या घरातील बाथरुममधील भिंतीतून 12 लाख रुपये सापडले होते. हे पैसे वडिलांनी भिंतीत लपवून ठेवल्याचं स्पष्टीकरण माला यांनी अधिकाऱ्यांना दिलं होतं. हे प्रकरण नंतर कोर्टात गेलं आणि कोर्टात माला सिन्हा यांनी जो खुलासा केला, ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. हा सगळा पैसा वेश्या व्यवसायातून कमावल्याचं त्यांनी कोर्टासमोर सांगितलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने फिल्म इंडस्ट्रीत खळबळ माजली होती. त्यानंतर त्यांचं फिल्मी करिअरसुद्धा वाचू शकलं नाही.
माला सिन्हा यांना प्रतिभा सिन्हा ही मुलगी आहे. प्रतिभाने बॉलिवूडमध्ये मोठ्या धूमधडाक्यात पदार्पण केलं. ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटात त्यांच्यावर चित्रित केलेलं ‘परदेसी परदेसी’ हे गाणं आजही लोकप्रिय आहे. मात्र त्यानंतर प्रतिभाच्या कारकिर्दीत फारशी प्रगती झाली नाही. माला सिन्हा आता सार्वजनिक ठिकाणी फारच क्वचितच दिसतात. 1994 मध्ये त्यांनी ‘जिद’ हा शेवटचा चित्रपट केला होता.