टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता विकास सेठीचं वयाच्या 48 व्या वर्षी कार्डिॲक अरेस्टने निधन झालं. सोमवारी 9 सप्टेंबर रोजी मुंबईत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. विकासची पत्नी जान्हवीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित विकासच्या अंत्यसंस्काराविषयी माहिती दिली. ‘अत्यंत दु:खद अंत:करणाने आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की विकास सेठीचं 8 सप्टेंबर रोजी निधन झालं असून त्याच्या पार्थिवावर हिंदू पद्धतीनुसार 9 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार पार पडणार आहेत’, असं या पोस्टमध्ये लिहिलं होतं. विकासच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अत्यंत मोजके टीव्ही सेलिब्रिटी पोहोचले होते. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून अनेक कलाकारांच्या अनुपस्थितीबद्दल चाहत्यांनी सवाल केला.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये विकासची आई हुंदके देत रडताना दिसून येत आहेत. त्याचसोबत अंत्यदर्शनासाठी पोहोचलेल्या कलाकारांमध्ये हितेश तेजवानी, शरद केळकर दिसत आहेत. इतकी मोठी टीव्ही इंडस्ट्री असून आणि विकासने बऱ्याच लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं असूनही अंत्यविधीला अत्यंत मोजके कलाकार उपस्थित राहिले, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी टीव्ही सेलिब्रिटींबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
विकासने ‘कहीं तो होगा’, ‘दो दिल बंधे एक डोरी से’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’, ‘ससुराल सिमर का’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय. त्याने करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातही भूमिका साकारली होती. यामध्ये तो रॉबीच्या भूमिकेत होता. मात्र गेल्या बऱ्याच काळापासून तो टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर होता. विकासने ‘नच बलिये’ या डान्स शोमध्ये पूर्व पत्नी अमितासोबत भाग घेतला होता. हे दोघं लग्नाच्या काही वर्षांनंतर विभक्त झाले. त्यानंतर 2018 मध्ये त्याने जान्हवीशी दुसरं लग्न केलं. जान्हवीने 2021 मध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला. विकासच्या पश्चात त्याची पत्नी आणि जुळी मुलं असा परिवार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोविडच्या आधीपासूनच विकासच्या हाती कोणतंच काम नव्हतं. त्याने मालिकेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण त्याला भूमिकाच मिळत नव्हत्या. हळूहळू विकास टीव्ही इंडस्ट्रीतील त्याच्या मित्रांपासूनही दूर होऊ लागला होता. त्याने सर्वांसोबतचा संपर्क तोडला होता. गेल्या काही काळापासून तो आर्थिक समस्यांसाचाही सामना करत होता.