जमिनीचा छोटा भाग खरेदी करणं अनेकांसाठी प्रतिष्ठेचा विषय असतो. स्वत:च्या मालकीची जमीन विकत घेणं हे प्रत्येकालाच शक्य होतं असं नाही. त्यातही प्रायव्हेट आयलँड (बेट) खरेदी करणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट झाली. फक्त गर्भश्रीमंत लोकच स्वत:साठी संपूर्ण बेट खरेदी करू शकतात. बॉलिवूड इंडस्ट्रीत फक्त तीन सेलिब्रिटींनी प्रायव्हेट आयलँड विकत घेतलं आहे. त्यापैकी एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीने गेल्या आठ वर्षांत बॉक्स ऑफिसवर सुपरहिट असा चित्रपट दिला नाही, मात्र तरीसुद्धा खासगी बेट खरेदी करणारी ती एकमेव भारतीय अभिनेत्री ठरली आहे.
देशातील सर्वांत यशस्वी आणि श्रीमंत अभिनेत्रीच हे करू शकते, असं अनेकांना वाटलं असेल. ऐश्वर्या राय ही सर्वांत श्रीमंत भारतीय अभिनेत्री आहे, पण तिच्याही मालकीचं प्रायव्हेट बेट नाही. प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री आहेत. पण त्यांच्याही नावे हे बेट नाही. इतकंच काय तर आलिया भट्ट, कतरिना कैफ, समंथा रुथ प्रभू, करीना कपूर यांच्यासारख्या आघाडीच्या अभिनेत्रींनीही प्रायव्हेट आयलँड विकत घेतलेलं नाही. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून जॅकलीन फर्नांडिस आहे. श्रीलंकन अभिनेत्री जॅकलीन ही गेल्या 15 वर्षांपेक्षा अधिक काळापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.
जॅकलीन सध्या बॉलिवूडमध्ये आघाडीवर नसली तरी दशकापूर्वी तिची खूप क्रेझ होती. तिने ‘मर्डर 2’, ‘हाऊसफुल 2’, ‘रेस 2’, ‘किक’ यांसारखे बॅक-टू-बॅक हिट चित्रपट दिले होते. 2016 मध्ये तिचा शेवटचा हिट चित्रपट ‘हाऊसफुल 3’ प्रदर्शित झाला होता. त्यापूर्वी 2011 ते 2014 पर्यंत ती सर्वांत लोकप्रिय आणि चर्चेतली अभिनेत्री होती. 2012 मध्ये करिअरच्या शिखरावर असताना तिने हा प्रायव्हेट आयलँड विकत घेतला होता. श्रीलंका या तिच्या मायदेशीच तिने बेट खरेदी केलंय.
रिपोर्ट्सनुसार, जॅकलीनने 2012 मध्ये हा आयलँड खरेदी केला असून तिथे ती आलिशान व्हिला बांधण्याचा विचार करत होती. तिने हे बेट स्वत:साठी विकत घेतलं की कर्मशिअल कारणासाठी हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही. पण ‘मर्डर 2’ आणि ‘हाऊसफुल 2’ या चित्रपटांच्या यशानंतर तिने हे बेट विकत घेतलं होतं. जॅकलीनने 2009 मध्ये ‘अलादिन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र त्याच्या दोन वर्षांनंतर ‘मर्डर 2’ या चित्रपटामुळे ती प्रकाशझोतात आली. त्यानंतरच्या पाच वर्षांत तिने पाच हिट चित्रपट दिले.