नवी दिल्ली | 24 जुलै 2023 : ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपनहायमर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. एकीकडे जगभरात या चित्रपटाची जोरदार कमाई सुरू असताना दुसरीकडे भारतात यातील एका सीनवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. चित्रपटातील एका इंटिमेट सीनदरम्यान मुख्य कलाकाराच्या हातात भगवद् गीता पाहिल्यानंतर नेटकरी चांगलेच भडकले आहेत. हा सीन चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी होत आहे. भारत सरकारचे माहिती आयुक्त उदय माहूरकर यांनी दिग्दर्शन नोलनला एक खुलं पत्र लिहिलं आहे. ‘चित्रपटातील भगवद् गीतेचा सीन म्हणजे हिंदू धर्मावरील त्रासदायक हल्ला आहे’, असं त्यांनी या पत्रात म्हटलंय. त्याचसोबत हा सीन जगभरातील थिएटर्समधून काढून टाकण्यास सांगितलं आहे.
“आम्ही अब्जावधी हिंदूंच्या वतीने आणि पूज्य भगवद् गीतेनं बदललेल्या जीवनाच्या कालातीत परंपरेच्या वतीने विनंती करतो की आमच्या पूज्य ग्रंथाची प्रतिष्ठा राखण्यासाठी तुम्ही चित्रपटातून हे दृश्य काढून टाकावं. जगभरातील थिएटर्समधून हे दृश्य काढून टाकण्यासाठी तुम्ही आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत. जर तुम्ही या आवाहनाकडे दुर्लक्ष केलं तर ते भारतीय सभ्यतेवर जाणीवपूर्वक केलेला हल्ला मानला जाईल. तुम्ही योग्य ते पाऊल उचलाल अशी आम्हाला अपेक्षा आहे”, असं ‘सेव्ह कल्चर सेव्ह इंडिया फाऊंडेशन’चे संस्थापक माहूरकर यांनी पत्रात लिहिलं.
भौतिकशास्त्रज्ञ जे. रॉबर्ट ओपनहायमर यांना अणुबॉम्बचे जनक मानलं जातं. त्यांनी संस्कृत भाषा शिकली होती आणि त्यांच्यावर भगवद् गीतेचा खूप प्रभाव असल्याचं म्हटलं जातं. एका मुलाखतीत ते म्हणाले होते, “16 जुलै 1945 रोजी अण्वस्त्राचा पहिला स्फोट पाहिल्यानंतर माझ्या मनात एकच विचार आला होता. तो विचार म्हणजे प्राचीन हिंदू ग्रंथातील एक श्लोक होता. आता मी मृत्यू बनलोय, जगाचा नाश करणारा.. असा तो श्लोक होता.”
या चित्रपटात अभिनेता सिलियन मर्फीने ओपनहायमरची भूमिका साकारली आहे. चित्रपटात मानसशास्त्रज्ञ जीन टॅटलरसोबतच्या (फ्लोरेन्स पग) एका इंटिमेट सीनदरम्यान ती त्याला संस्कृत पुस्तकातील एक श्लोक वाचायला सांगते. या पुस्तकाचं शीर्षक आणि मृखपृष्ठ स्पष्ट दिसत नाही. मात्र टॅटलरच्या आग्रहामुळे ओपनहायमर तिने सांगितलेला श्लोक वाचतो. ‘आता मी मृत्यू बनलोय, जगाचा नाश करणारा’, असाच तो श्लोक आहे.
स्टुडिओ युनिव्हर्सल पिक्चर्सने या चित्रपटाची लांबी कमी करण्यासाठी काही दृश्ये कापल्यानंतर सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (CBFC) या चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिलं आहे. त्यामुळे 13 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट योग्य असल्याचं म्हटलं गेलंय. तर दुसरीकडे अमेरिकेत या चित्रपटाला ‘R’ (रेस्ट्रिक्टेड) रेटिंग देण्यात आलं आहे. याचा अर्थ 17 वर्षांखालील प्रेक्षक पालकांसोबत हा चित्रपट पाहू शकतात. ख्रिस्तोफर नोलनचा हा पहिला ‘आर’ रेटेड चित्रपट आहे.
‘ओपनहायमर’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सिलियन मर्फीने सांगितलं होतं की त्याने चित्रपटाची तयारी करताना भगवद् गीता वाचली होती. ‘गीतेतील मजकूर अत्यंत सुंदर आणि खूप प्रेरणादायी वाटले’, असं तो म्हणाला होता.