मुंबई: 11 मार्च 2024 | गेल्या वर्षी जुलै महिन्यात ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपनहायमर’ हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जोरदार कमाई तर केलीच शिवाय सोशल मीडियावरही त्याची भरपूर चर्चा झाली. आता ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘ओपनहायमर’चाच डंका पहायला मिळाला. 13 नामांकनं मिळवलेल्या या चित्रपटाने तब्बल सात ऑस्कर पुरस्कार आपल्या नावे केली आहेत. किलियन मर्फीची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट वादाचा विषयसुद्धा ठरला होता. या चित्रपटातील भगवद् गीतेच्या सीनवरून भारतातील प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. चित्रपटातील एका इंटिमेट सीनदरम्यान मुख्य कलाकाराच्या हातात भगवद् गीता पाहिल्यानंतर नेटकरी चांगलेच भडकले होते. भारत सरकारचे माहिती आयुक्त उदय माहूरकर यांनी दिग्दर्शकांना खुलं पत्रसुद्धा लिहिलं होतं.
या चित्रपटात किलियन मर्फीने ओपनहायमरची भूमिका साकारली आहे. भौतिकशास्त्रज्ञ जे. रॉबर्ट ओपनहायमर यांना अणुबॉम्बचे जनक मानलं जातं. त्यांनी संस्कृत भाषा शिकली होती आणि त्यांच्यावर भगवद् गीतेचा खूप प्रभाव असल्याचं म्हटलं जातं. एका मुलाखतीत ते म्हणाले होते, “16 जुलै 1945 रोजी अण्वस्त्राचा पहिला स्फोट पाहिल्यानंतर माझ्या मनात एकच विचार आला होता. तो विचार म्हणजे प्राचीन हिंदू ग्रंथातील एक श्लोक होता. आता मी मृत्यू बनलोय, जगाचा नाश करणारा.. असा तो श्लोक होता.” चित्रपटात मानसशास्त्रज्ञ जीन टॅटलरसोबतच्या (फ्लोरेन्स पग) एका इंटिमेट सीनदरम्यान ती त्याला संस्कृत पुस्तकातील एक श्लोक वाचायला सांगते. या पुस्तकाचं शीर्षक आणि मृखपृष्ठ स्पष्ट दिसत नाही. मात्र टॅटलरच्या आग्रहामुळे ओपनहायमर तिने सांगितलेला श्लोक वाचतो. ‘आता मी मृत्यू बनलोय, जगाचा नाश करणारा’, असाच तो श्लोक आहे.
कलाकारांच्या इंटिमेट सीनदरम्यान भगवद् गीतेच्या वापराची काहीच गरज नव्हती, असं मत अनेकांनी मांडलं होतं. या सीनवरून सनातन धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. ‘चित्रपटात भगवद् गीतेचा सीन आहे पण त्यात कोणत्याही धर्माचा किंवा धार्मिक ग्रंथाचा अपमान करण्याचा हेतू होता असं मला वाटत नाही. तुम्ही संपूर्ण चित्रपट पाहिला तर तुम्हाला नक्कीच कारण समजेल’, अशीही बाजू काहींनी मांडली होती.
‘ओपनहायमर’ या हॉलिवूड चित्रपटाची क्रेझ भारतातही पहायला मिळाली होती. ख्रिस्तोफर नोलनच्या या चित्रपटाला आताच्या काळातील सर्वांत मोठ्या चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखलं जात आहे. 1930 आणि 40 च्या दशकात अणुबॉम्ब तयार करण्याचा अमेरिकेच्या गुप्त ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’वर या चित्रपटाची कथा आधारित आहे. शास्त्रज्ञ रॉबर्ट जे ओपनहायमर यांच्या नजरेतून ही कथा सांगितली जात आहे.