Oscars 2023 : यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतासाठी अत्यंत खास ठरला आहे. अमेरिकेतल्या लॉस एंजेलिसमध्ये पार पडलेल्या प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताने इतिहास रचला. एस. एस. राजामौली यांच्या RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या विभागात ऑस्कर पुरस्कार पटकावला. गाण्याला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कलाकार आणि चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. सिनेमाने ऑस्कर पुरस्कार तर मिळवला, पण होस्ट सिनेमाबद्दल असं काही म्हणाला, ज्यामुळे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. सध्या सर्वत्र आरआरआर सिनेमाची चर्चा रंगली आहे. शिवाय व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.
दरम्यान, ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचा होस्ट जिमी किमेल याने पुरस्कार सोहळ्यादरम्यान एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ सिनेमाचा उल्लेख बॉलिवूड सिनेमा म्हणून केला. ज्यामुळे ट्विटरवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. जिमी किमेल पुरस्कार सोहळ्यादरम्यान विभागाची घोषणा करत होता. तेव्हा आरआरआर गाण्यावर स्टेप करत त्याने काही डान्सर्सना बाजूला केलं. तेव्हा ‘आरआरआर’ सिनेमाचा उल्लेख त्याने बॉलिवूड सिनेमा म्हणून केला.
Literally Oscar kottesam ane feels #NaatuNaatuSong high #RamCharanBossingOscars #GlobalStarRamCharan #RamCharan pic.twitter.com/7I1o5lIAbt
— Shiva Roy (@ShivARoyal22) March 13, 2023
जिमी किमेल याचा पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ पोस्ट करत एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘जिमी किमेल करेक्शन – आरआरआर भारतीय, तेलुगू, तामिळ सिनेमा आहे. बॉलिवूड नाही…’, अन्य एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘प्रिय ऑस्कर्स टीम… आरआरआर सिनेमा बॉलिवूड नाही… हे लिहून घ्या…’, तर तिसरा युजर म्हणाला, ‘आरआरआर टॉलिवूड सिनेमा आहे, बॉलिवूड नाही…’ सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगत आहे.
जिमी किमेल याने पुरस्कार सोहळ्यादरम्यान एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ सिनेमाचा उल्लेख बॉलिवूड सिनेमा म्हणून केल्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आरआरआर सिनेमा बॉलिवूड सिनेमा नसून भारतातील दक्षिणेतील तेलुगू सिनेविश्वातील सिनेमा असल्याचं एसएस राजामौली यांनी स्पष्ट केलं होतं.
९५ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात भारताने यंदा एक नाही तर, दोन पुरस्कारांवर नाव कोरलं आहे. ज्यामुळे कलाकार आणि भारतात आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ऑस्कर विजेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ गाण्याने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला. ओरिजिनल साँग (सर्वोत्कृष्ट मूळ गाणं) विभागात ऑस्कर पुरस्कार पटकावणारा हा पहिला भारतीय सिनेमा ठरल्यानंतर मोदी यांनी नाटू नाटू गाण्याच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.