Oscars 2024 : सध्या फक्त देशातच नाहीतर, संपूर्ण जगभरात फक्त आणि फक्त ‘ऑस्कर’ पुरस्कार सोहळ्याची चर्चा सुरु आहे. यंदाच्या वर्षी ‘ऑस्कर’ पुरस्कार सोहळ्यात ‘ओपनहायमर’ सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळाला. सांगायचं झालंतर, गेल्या वर्षी ‘आरआरआर’ सिनेमामुळे ‘ऑस्कर’ पुरस्कार सोहळ्यात भारतीय सिनेमांचं स्थान अव्वल स्थानी होतं. पण यंदाच्या वर्षी कोणत्याच भारतीय सिनेमाला आणि लघू चित्रपटाला ‘ऑस्कर’ पुरस्कार मिळालेला नाही... ‘ऑस्कर’ विजेत्यांच्या यादीत भारतीय सिनेमे का राहतात मागे? याचं मोठं कारण अखेर समोर आलं आहे.
‘ऑस्कर’ विजेत्यांच्या यादीत भारतीय सिनेमे का राहतात मागे? यामागचं कारण ऑस्कर विजेत्या आणि निर्मात्या गुनीत मोंगा कपूर यांनी सांगितलं… मुलाखतीत गुनीत मोंगा कपूर यांनी भारतीय सिनेमांबद्दल मोठं सत्य आणि सिनेमांची पडती बाजू सांगितली आहे.
गुनीत मोंगा कपूर म्हणाल्या, ‘कोणत्या सिनेमाचा फिल्म फेस्टिवलमध्ये बोलबाला होता, ही गोष्ट आपण पहिल्यांदा पाहायला हवी. उत्तम सिनेमा निर्मात्यांनी पुढे यावं यासाठी हा मंच असते. भारतीय सिनेमांना एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो…’
पुढे गुनीत मोंगा कपूर म्हणाल्या, ‘आपल्या सिनेमाला ऑस्करपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अमेरिकेतील प्रसिद्ध आणि नावाजलेले डिस्ट्रीब्यूटर्सना शोधणं. जे तुमच्या सिनेमाला प्रमोट करु शकतात. पैसा आणि वेळ खर्च करण्याची त्यांची तयारी असायला हवी…’
‘भारतीय सिनेमांना ऑस्करपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्तम मोहीमेची योजना करण्याची गरज आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, करण जोहरच्या ‘लंच बॉक्स’चे प्रमोशन केले तर ही बातमी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल. ही एक-दोन दिवसांची गोष्ट नाही, ही एक दीर्घ प्रक्रिया आहे.’
‘पुरस्कार मिळणं म्हणजे आपलं कौशल्य नसतं. पण यामुळे सिनेमी निर्मात्यांना जागतिक व्यासपीठावर मान्यता मिळते… ही फार अभिमानाची गोष्ट आहे. ही गोष्ट फार आनंदाची असते. माझ्यावर पुरस्कार कधीच दबाव टाकत नाही. मी कधीच पुरस्कारांसाठी सिनेमे करत नाही… मी रोज फक्त माझं काम करते, मेहनत करते… बाकी सर्व देवाची कृपा… असं देखील गुनीत मोंगा कपूर म्हणाल्या…
गुनीत मोंगा कपूर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपट श्रेणीमध्ये ‘द एलिफंट व्हिस्पर्स’साठी गुनीत मोंगा यांनी ऑस्कर जिंकला होता. तेव्हा सोशल मीडियावर गुनीत मोंगा यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. एवढंच नाहीतर, असंख्य लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यंदाच्या वर्षी ‘ऑस्कर’मध्ये ‘टू किल अ टायगर’ सिनेमाला मानांकन मिळालं होतं. पण सिनेमा शर्यतीत मागे राहिला…