सध्या नवीन वर्षाच्या निमित्ताने अने सेलिब्रिटी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेरगावी जात आहेत. तसेच अनेक ठिकाणी फिरण्यासाठी जाताना दिसतात. पण एका अभिनेत्रीला मात्र तिच्या सुट्ट्या चांगल्याच महागात पडलेल्या दिसत आहे.
लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्रीला तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेणं महागात पडलेलं आहे कारण तिला थेट रुग्णालयातच दाखल करण्यात आलं आहे. तिने तिचे काही हॉस्पिटलमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून तिच्या चाहत्यांसोबत ही गोष्ट शेअर केली आहे.
सृष्टी रोडेला न्यूमोनिया
अभिनेत्री अन् ‘बिग बॉस 12’ फेम सृष्टी रोडेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तिने रुग्णालयाच्या बेडवरून स्वत:चे अस्वस्थ करणारे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हा फोटो पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांची चिंता वाढलीये. गुरुवारी 26 डिसेंबर रोजी, अभिनेत्रीने हॉस्पिटलमधील तिचे फोटो शेअर करून चाहत्यांना हेल्थ अपडेट दिली.
अभिनेत्रीने रुग्णालयात दाखल होण्यामागचं कारणही सांगितलं आहे. सृष्टीने सांगितले आहे की, सुट्टीच्या काळात आजारी पडल्याने तिला ॲमस्टरडॅममधील रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे.
हॉस्पिटलमधील फोटो शेअर
इन्स्टाग्रामवर सृष्टीने हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘माझी ऑक्सिजनची पातळी अचानक कमी झाली आणि त्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये आहे, या वेदना सहन करणं माझ्यासाठी कठीण आहे. मला भीती वाटत होती की मी घरी जाऊ शकेन की नाही.’ रिपोर्टनुसार, अभिनेत्रीला न्यूमोनिया झाला होता, त्यामुळे तिला श्वास घेता येत नव्हता.
ऑक्सिजनची पातळी अचानक कमी झाली
सृष्टी रोडेचे हे फोटो पाहिल्यानंतर ती लवकरात लवकर बरी होण्यासाठी चाहते प्रार्थना करताना दिसत आहेत. सृष्टीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘मला तुम्हा सर्वांसोबत काहीतरी शेअर करायचं होतं. जेव्हा मी युरोपला गेली तेव्हा माझ्यासोबत असं काही घडलं जे मी स्पष्ट करू शकत नाही. ॲमस्टरडॅममध्ये मला न्यूमोनिया झाला आणि त्यामुळे माझी प्रकृती बिघडली. माझी ऑक्सिजनची पातळी अचानक कमी झाली आणि जेव्हा मी शुद्धीवर आले, तेव्हा हॉस्पिटलमध्ये होते. मला भीती वाटत होती की मी घरी पोहोचू शकेन की नाही.’
आजारातून बरा होण्याचा प्रयत्न करत आहे
सृष्टी पुढे म्हणाली की, ‘माझी प्रकृती बिघडली होती त्यात मी निघण्यापूर्वीच माझा व्हिसा संपला. अखेर सर्व खटाटोप केल्यानंतर मी मुंबईत परतले आहे. पण या आजारातून मी अजूनही सावरू शकले नाहीये. न्यूमोनियापासून बरं होण्यासाठी वेळ लागतो आणि माझे डॉक्टर म्हटल्याप्रमाणे काही महिने लागू शकतात, परंतु मी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. मी अजूनही कमकुवत आहे, पण मी बरं होण्याचा प्रयत्न करतेय.’ असं म्हणत सृष्टीने तिचे हेल्थ अपडेट तिच्या चाहत्यांना दिले आहेत.
दरम्यान, सृष्टीच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच या मालिकांच्या माध्यमातून ती अनेक घराघरात पोहोचली आहे.