आयेशा सय्यद, मुंबई : सध्या महाराष्ट्राचं राजकारण ईडीची (ED) चौकशी आणि आरोप्रत्यारोपांच्या फैरी या भोवती फिरतंय. नेत्यांची होणारी ईडी चौकशी, संबंधित पक्षांच्या कार्यकर्त्यांची निदर्शनं जनतेचं लक्ष वेधत आहेत. या ईडी चौकशीत राज्यमंत्रिमंडळातील मंत्र्यांचा देखील समावेश आहे. अश्यात केंद्र विरूद्ध राज्य असा संघर्ष पहायला मिळतोय. विरोधी पक्षाचे नेतेही चौकशीच्या फैरी अडकलेल्या नेत्यांच्या विरोधात आरोपपत्र सादर करत आहेत. पण अश्या या सगळ्या गंभीर वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून गमतीशीर गाणं तयार करण्यात आलं आहे. हे गाणं सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेतंय. या गाण्याचे बोल आहेत, “लय सुसाट, तुफान, ताणूताणू मागं लागलीय ईडी…”
ईडी चौकशीवर आधारित गाणं
“पडलाय दणका, मोडलाय मणका, पडलीय चांगलीच पळी… कशी ही यायची पडी… लय सुसाट, तुफान, ताणूताणू मागं लागलीय ईडी…” हे गाणं सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. या गाण्याची संकल्पना राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांची आहे. तर प्रदिप कांबळे यांनी हे गाणं लिहिलं आहे. तसंच त्यांनीच या गाण्याला संगीतबद्ध केलंय आणि गायलं सुद्धा आहे.
“सध्या केंद्र सरकार म्हणजे भाजप सरकार ज्या पद्धतीने सीबीआय आणि ED या संस्थेचा गैरवापर ज्या पद्धतीने करत आहे. रोज कोणाच्या ना कोणाच्या घरी ऑफिसवर सीबीआय आणि ED चे छापे केंद्र सरकार टाकत आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री व नेते जरा जरी काही बोलले की लगेच ED चे छापे त्याठिकाणी टाकत असतात. दररोज टीव्ही लावला बातम्या पाहायला सुरुवात केली की रोज कुठल्या ना कुठल्या मंत्र्याच्या घरी त्यांच्या नातेवाईकांच्या घरी सीबीआयचे छापे किंवा Ed छापे टाकले जातात त्या अनुषंगाने खरंतर हे गमतीशीर गाणं राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या वतीने तयार करण्यात आलं आहे “, असं राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी या गाण्याविषयी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घरावर ईडीचे छापे
मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घरावर ईडीकडून छापे टाकण्यात येत आहेत. याबाबत बोलण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेची जोरदार चर्चा झाली. सध्या राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक यांच्यावरही ईडीकडून कारवाई केली जातेय. मलिक सध्या कोठडीत आहेत. याशिवाय भावना गवळी, प्रताप सरनाईक, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अजित पवार, प्राजक्त तनपुरे या नेत्यांचीही ईडीने चौकशी केली आहे. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादीने हे एक भन्नाट गाणं राज्यातील जनतेच्या भेटीला आणलंय.
संबंधित बातम्या