मुंबई : जर, तुम्ही Netflix ची लोकप्रिय वेब सीरीज Money Heist चे चाहते असाल आणि शेवटच्या सीझनचा शेवटचा भाग रिलीज होत असताना, सीरीज कायमची संपणार असल्याचं दु:ख वाटत असेल, तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. ‘मनी हाईस्ट’ हा शो नक्कीच संपणार आहे, पण त्याची कथा मात्र सुरूच राहील. नेटफ्लिक्सने या स्पॅनिश क्राईम वेब सीरीजच्या नव्या अध्यायाची अर्थात ‘स्पिन ऑफ बर्लिन’ची (Spin off Berlin) घोषणा केली आहे.
मंगळवारी जागतिक फॅन इव्हेंटमध्ये, नेटफ्लिक्सने घोषणा केली की, ‘बर्लिन’ 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या स्पिन-ऑफ सीरीजमध्ये, शोचे मुख्य पात्र आंद्रेस डी फोनोलोसा म्हणजेच बर्लिनची संपूर्ण कथा दाखवली जाईल. ‘बर्लिन’ हे या पात्राचे टोपणनाव आहे. मालिकेतील सर्व पात्रांना कोणत्या ना कोणत्या शहराचे नाव देण्यात आले आहे. वास्तविक, ‘बर्लिन’ मनी हाईस्टचे मुख्य पात्र आणि मास्टरमाइंड ‘प्रोफेसर’चा मोठा भाऊ आहे आणि स्पेनच्या रॉयल मिंटमध्ये हाईस्ट दरम्यान प्रोफेसरनंतर दुसरा सर्वात महत्वाचा टीम मेंबर होता.
Este atraco llega a su fin… pero la historia continúa… Berlín 2023, solo en Netflix.
This heist might come to an end… But the story continues… Berlin 2023, only on Netflix.#LCDP5 #MoneyHeist pic.twitter.com/lANhx8Ayv4
— La Casa de Papel (@lacasadepapel) November 30, 2021
बर्लिनचे पात्र अतिशय रंजक दाखवले आहे. तो प्रोफेसरसारखी गंभीर नाही, मात्र काहीसा गूढ आहे. याला स्त्रियांमध्ये अधिक रस आहे. Heist चे संपूर्ण प्लॅन बनवण्यात त्याचा मोठा हात होता. बर्लिनचे पात्र शोमध्ये अनेक रंग आणि भावनांमधून जाते. बर्लिन, जो सुरुवातीला टीम मेंबरशी सतत भांडतो, मात्र अखेरीस त्याच्या नेतृत्वाने सगळे प्रभावित होतात. बर्लिनला असाध्य आजाराचे निदान झालेले असते आणि पहिल्या चोरीच्या वेळी टीमला वाचवताना त्याचा मृत्यू होतो.
‘मनी हाईस्ट’च्या सीझन 5च्या पहिल्या भागात बर्लिनची झलक आणि काही दृष्यांद्वारे त्याच्या मागील कथेचे काही भाग देखील दाखवले गेले आहेत. त्याची प्रेमकहाणी आणि मुलाची ओळख आता प्रेक्षकांना झाली आहे. या शोमध्ये स्पॅनिश अभिनेता पेड्रो अलोन्सोने ‘बर्लिन’ हे पात्र साकारले आहे. याव्यतिरिक्त, नेटफ्लिक्सने घोषणा केली की, ‘स्क्विड गेम’ फेम अभिनेता पार्क हे-सू हा ‘मनी हाईस्ट’च्या कोरियन आवृत्तीमध्ये ‘बर्लिन’ची भूमिका साकारेल.
‘मनी हाईस्ट’च्या शेवटच्या सीझनमध्ये 10 भाग आहेत. पहिले पाच भाग 3 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाले. त्याच वेळी, उर्वरित पाच भाग 3 डिसेंबर रोजी प्रदर्शित केले जाणार आहेत. 2020 मध्ये 8 भागांसह चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. स्पॅनिश व्यतिरिक्त, चारही सीझन इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये उपलब्ध आहेत.
स्पॅनिशमध्ये ‘मनी हाईस्ट’ ‘ला कासा दे पापेल’ नावाने तयार केली गेली. मात्र, हा शो टीव्हीवर फ्लॉप ठरला होता. 2017 मध्ये स्पॅनिश भाषेत हा शो टीव्हीवर प्रसारित झाला होता. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘मनी हाईस्ट: द फेनोमेना’ या माहितीपटात हा शो फ्लॉप ठरल्याचा उल्लेख देखील आहे. त्यानुसार, स्पॅनिश टीव्ही चॅनेल ‘अँटेना 3’साठी प्रथम मनी हाईस्टची निर्मिती करण्यात आली होती. सुरुवातीला हा शो प्रचंड यशस्वी झाला, पण हळूहळू त्याचा आलेख घसरत गेला. दुसऱ्या सीझननंतर तो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या फ्लॉप टीव्ही मालिकेत नेटफ्लिक्सने रस दाखवला. नेटफ्लिक्सने या शोचे हक्क विकत घेतले आणि हा शो संपूर्ण जगाला दाखवण्याचे ठरवले. नेटफ्लिक्सने सुरुवातीला कोणतीही जाहिरात केली नसली तरी, स्पेनबाहेरील दर्शकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि हळूहळू हा शो जगभर हिट झाला.