मुंबई : नेहमीच आपल्या उत्तमोत्तम अदाकारीने प्रेक्षकांना थक्क करणारी, अभिनेत्री तापसी पन्नू (Tapsee Pannu) ‘रश्मी रॉकेट’ (Rashmi Rocket) या आपल्या आगामी चित्रपटाद्वारे भारतीय प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घ्यायला सज्ज झाली आहे. तापसीचा हा आगामी चित्रपट येत्या दसऱ्याला म्हणजेच 15 ऑक्टोबरला ‘झी5’वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांच्या आरएसवीपी आणि मँगो पीपल मीडियाद्वारे करण्यात आली आहे.
‘रश्मी रॉकेट’ ही एका छोट्या गावातल्या तरुण मुलीची कथा आहे. मात्र, तिच्याकडे एक अविश्वसनीय अशी शक्ती आहे. आकर्ष खुराना यांच्याद्वारे दिग्दर्शित ‘रश्मी रॉकेट’, नंदा पेरियासामी यांच्या मूळ कथेवर आधारित आहे. यामध्ये ‘रश्मी रॉकेट’ला आपले स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची आणि स्पर्धेत व्यावसायिक रूपाने सहभागी होण्याची संधी मिळते. मात्र, तिला हेही जाणवते की, फिनिश लाईन आणि धावणे यामध्ये अनेक संकटे आहेत. अखेरीस ही एथलेटिक स्पर्धा सम्मान आणि तिच्या व्यक्तिगत लढाईत रूपांतरित होते.
दोन मिनिट पन्नास सेकंदाच्या या ट्रेलरची सुरुवात एक आईच्या तक्रारीने होते. जी मुलगी आपलं ऐकतच नाही… असं म्हणत गोड प्रेमळ तक्रार करते. लहानपणापासून अतिशय वेगाने धावणाऱ्या या मुलीची निवड आंतरराष्ट्रीय स्पर्धेत होते आणि या दरम्यान तिला अनेक भयानक प्रसंगांना सामोरे जावे लागते. अनेक पदकं मिळवून देशाचं नाव उंचावणाऱ्या या मुलीला एका चाचणीच्या नावाखाली अनेक आरोप केले जातात. तिचे करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, एका वकिलाच्या सहाय्याने क्रीडाक्षेत्रातील सगळ्या महिला खेळाडूंना न्याय मिळावा यासाठी ही केस सुरु केली जाते. एकंदरीत हा ट्रेलर चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढवत आहे.
तापसी पन्नू म्हणते की, “हा चित्रपट एका वेगळ्या तऱ्हेने खास आहे. बऱ्याचदा माझ्याशी तेव्हा संपर्क केला जातो जेव्हा स्क्रिप्ट किंवा दिग्दर्शक चित्रपट बनवण्यासाठी तयार असतात. मात्र, या चित्रपटाच्या कथेची वन लाईन चेन्नईमध्ये माझ्याकडे आली आणि तिथून एक पूर्ण चित्रपट बनण्याची तयारी सुरू झाली. असे आधी कोणत्या चित्रपटांविषयी झाले नव्हते. पहिल्या दिवसापासूनच प्रत्येक जण या कथेवर इतका ठाम होता की, कोणा स्टॅक होल्डरसोबत जाण्यासाठी आणि यासाठी आपले सर्वश्रेष्ठ देण्यासाठी तयार करणे कठीण गेले नाही. यासाठी या चित्रपटाचा परिणाम मला माझ्या अन्य चित्रपटांच्या तुलनेत अधिक प्रभावित करेल आणि मला याचा खूप अभिमान आहे.”
निर्देशक आकर्ष खुराना याविषयी बोलताना म्हणाले की, “एक प्रेक्षक म्हणून मला नेहमीच, कोर्ट रूम ड्रामा, परिपक्व रोमांस आणि खेळपटांमध्ये रुची राहिली आहे. एक कथाकार म्हणून, मी नेहमीच पात्रांच्या बाह्य आणि आंतरिक प्रवासाचे आकर्षण राहिले आहे. या चित्रपटाने मला एका अशा गोष्टीवर काम करण्याची अनोखी संधी दिली, ज्यामध्ये या सर्व गोष्टी आहेत आणि सोबत तगडया कलाकारांची फौज आहे.”
रॉनी स्क्रूवाला, नेहा आनंद आणि प्रांजल खंडड़िया यांच्याद्वारे निर्मित, ‘रश्मी रॉकेट’ नंदा पेरियासामी, अनिरुद्ध गुहा आणि कनिका ढिल्लों द्वारा लिखीत आहे. यामध्ये सुप्रिया पाठक, अभिषेक बनर्जी, प्रियांशु पेन्युली आणि सुप्रिया पिळगांवकर देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत. ‘रश्मी रॉकेट’ 15 ऑक्टोबरला ‘झी5’वर प्रदर्शित होत आहे.