सोनी लिव्ह (Sony Liv) या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘स्कॅम 1992: हर्षद मेहता स्टोरी’ ही सीरिज तुफान गाजली. या सीरिजच्या यशानंतर आता स्कॅम फ्रँचाइजीमधील दुसऱ्या सीरिजची घोषणा नुकतीच झाली आहे. ‘स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी’ (Scam 2003: The Telgi Story) असं या वेब सीरिजचं नाव असून यामधील मुख्य भूमिकेवरून पडदा उचलण्यात आला आहे. देशभरात गाजलेल्या 20 हजार कोटींच्या तेलगी स्टॅम्प घोटाळ्यावर आधारित ही सीरिज आहे. यामध्ये अब्दुल करीम तेलगीची मुख्य भूमिका अभिनेता गगन देव रियार (Gagan Dev Riar) साकारणार आहेत. ही सीरिज स्टुडिओ नेक्स्टच्या सहकार्याने अॅप्लॉज एंटरटेनमेंटने निर्मित केली आहे. कर्नाटकातील खानापूर इथं जन्मलेल्या अब्दुल करीम तेलगीचा फळविक्रेत्यापासून ते सर्वांत मोठ्या घोटाळ्याचा मास्टरमाईंड बनण्यापर्यंतचा प्रवास या सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. तेलगी स्टँप घोटाळ्याने संपूर्ण देश हादरलं होतं. तेलगीने देशातील 12 राज्यांमध्ये 176 कार्यालयांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचं बनावट स्टँप विक्रीचं साम्राज्य राजरोस उभं केलं होतं.
तेलगी स्टँप घोटाळ्याचा छडा लावणारे पत्रकार संजय सिंग यांनी लिहिलेल्या ‘रिपोर्टर की डायरी’ या पुस्तकावर सीरिजची कथा आधारित आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक हंसल मेहता आणि तुषार हिरानंदानी या सीरिजचं दिग्दर्शन करणार आहेत. या सीरिजचा शूटिंगला सुरुवात झाली असून लवकरत ती SonyLIV या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल.
स्कॅम 1992 या वेब सीरिजमध्ये अभिनेता प्रतीक गांधीने हर्षद मेहताची भूमिका साकारली होती. त्याच्या दमदार अभिनयाला प्रेक्षकांकडून खूप चांगली दाद मिळाली. स्कॅम 2003 मध्ये तेलगीची भूमिका साकारणारे गगन देव रियार हे ज्येष्ठ रंगभूमी कलाकार आहेत. त्यांनी याआधी ‘सोनचिडियाँ’ आणि ‘अ सूटेबल बॉय’ यांमध्ये काम केलंय. प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने गगन यांची कास्टिंग केली आहे.
अब्दुल करीम तेलगी आणि त्याच्या भावांनी नाशिकच्या प्रींटिंग प्रेसमधून जुनी मशिनरी आणून बनावट मुद्रांक छापले होते. हे बनावट स्टँप देशभरात विकून त्याने कोट्यवधी रुपये जमवल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यातील आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. 2003 मध्ये तेलगीला अटक करण्यात आली होती. 20 हजार कोटींच्या बनावट मुद्रांक घोटाळ्यात तेलगीला 2007 मध्ये दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यावेळी त्याला 30 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. इतकंच नाही तर त्याच्यावर 202 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. 2017 मध्ये त्याचा बेंगळुरुतील सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला.