मुंबई : व्हॅलेंटाईनडेच्या (Valentine’s day) निमित्ताने ‘स्टोरीटेल ओरिजनल’ (Storytel Original) एक नवी कोरी विलक्षण ऑडिओ मालिका घेऊन येत आहे. आजची आघाडीच्या टेलिव्हिजन मालिका आणि चित्रपट लेखिका मनस्विनी लता रवींद्र (Manswini Lata Rravindra) यांनी लिहिलेली आणि अभिनेता ओंकार गोवर्धन (Omkar Gowardhan) आणि अभिनेत्री आरती मोरे (Arti More) या मराठी सेलिब्रिटींचा सहभाग असलेली ‘प्रेमिकल लोचा‘ची (Premical Locha) गुलाबी कथा आपल्या तरुण प्रेमी रसिकांसाठी ऑडिओ सिरीजमध्ये ‘स्टोरीटेल’ प्रदर्शित करत आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये गुपचूप राहणाऱ्या जोडप्याची ही धम्माल गोष्ट आहे. ही गोष्ट आहे साहिर आणि अनुजा यांची.
साहिर आणि अनुजा दोघं एकत्रं फ्लॅट घेऊन राहतायत, लिव्ह इनमध्ये. दोघांचं सगळं उत्तम सुरू आहे आणि एकदिवस अचानक साहिरचे आईवडिल घरात येतात आणि त्यांना कळतं आपला मुलगा एका मुलीसोबत राहतोय. मग काय अनुजाच्या आईवडिलांना पण खबर पोहोचते. साहिरचे आई-वडील टिपिकल मुंबईचे दोघंही नोकरी करणारे आणि अनुजाचे कोल्हापूरचे जुन्या विचारांचे पुरुषप्रधानता मानणारे आईवडिल समोरसमोर येतात. दोन्ही पालकांचं एकाच गोष्टीवर एकमत होतं. लग्नं. पण अनुजाला लग्नं नकोय आणि साहिरला वाटतं काय हरकत आहे आणि सुरू होतो लोचा. मग पुढे काय होतं…? घरच्यांना लग्न न करण्यासाठी पटवतात की दबावाला झूकून लग्न करतात. अनुजाला खरंच साहिरबरोबर कायम रहायचं असतं की नसतं या सगळ्यांची उत्तरं ऐकण्यासाठी ‘प्रेमिकल लोचा’ ही सिरीज ऐकावी लागेल.
ही गोष्ट लिहीली आहे मनस्विनी लता रवींद्र यांनी आणि त्याला आवाज दिला आहे अभिनेता ओंकार गोवर्धन आणि अभिनेत्री आरती मोरे यांनी. ओंकारला आपण सध्या महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय असलेल्या ‘आई कुठे काय करते’मध्ये पाहत आहोत. तसेच त्याला शाहिद कपूर, प्रियांका चोप्राच्या ‘कमिने’मध्ये पाहिले आहे. मराठीत ‘हा भारत माझा’, ‘संशय कल्लोल’, त्यासोबतच ‘डोक्याला शॉट’, अश्या अनेक चित्रपटांमध्ये विविधरंगी भूमिकांमध्ये पाहिले आहे. तर अभिनेत्री आरती मोरेचा अभिनय ‘झिंक चिक झिंक’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून. तर ‘करार’, ‘बाबांची शाळा’, ‘चिं.सौ.कां.’, ‘उबुंटू’ इत्यादी चित्रपटांमध्ये पाहिला आहे. या दोघांसोबतच लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांची संवादरुपी केमिस्ट्री ‘प्रेमिकल लोचा’ मध्ये बेमालून जमून आली आहे.
हुडहुडी भरणाऱ्या थंडीत गुलाबी उब देणाऱ्या उत्कंठावर्धक ‘प्रेमिकल लोचा’ची धम्माल खुसखुशीत कथा ‘स्टोरीटेल ऑडीओबुक्स’च्या माध्यमातून ऐकता येईल. व्हॅलेंटाईन डेला ही कथा जरूर ऐका… सळसळत्या तरुणीची धम्माल उडवणारी खुमासदार कथा, ऐकण्यासाठी ‘स्टोरीटेल’ने १४ फेब्रुवारीचा मुहूर्त निवडला आहे.
संबंधित बातम्या