लाहौर | पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल सईदा इम्तियाजच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. सईदाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट करण्यात आली होती. त्यानंतर तिच्या मृत्यूची बातमी वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर पसरली. मात्र थोड्या वेळानंतर सईदा जिवंत असून ती सुखरुप असल्याची माहिती समोर आली. खुद्द तिनेच इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. त्याचसोबत इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याचं तिने सांगितलं. “सकाळी उठल्या उठल्या मला सर्वांचे फोन आणि मेसेज येऊ लागले होते. माझ्यासोबत ही मस्करी कोणी केली माहीत नाही. पण त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना खूप मोठा धक्का बसला आहे”, असं ती म्हणाली.
सईदाच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिच्या निधनाबद्दलची पोस्ट लिहिण्यात आली होती. ‘अत्यंत जड अंत:करणाने आम्ही हे सांगू इच्छितो की सईदा इम्तियाजने या जगाचा निरोप घेतला आहे. सकाळी तिच्या रुममध्ये सईदा मृतावस्थेत आढळली. तिच्या आत्म्याला शांती मिळो’, अशी ही पोस्ट होती. सईदाची आई आणि तिचे भाऊबहीण पाकिस्तानात राहत नाहीत. त्यामुळे ही पोस्ट पाहिल्यानंतर त्यांनासुद्धा मोठा धक्का बसला होता.
सईदाचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट एकमेकांना लिंक होते, त्यामुळे एकाच वेळी हे दोन्ही अकाऊंट हॅक झाले. “एखाद्याची मस्करी करणे किंवा छळ करणे मी समजू शकते पण त्याची मर्यादा इतकी ओलांडू नये की त्यामुळे कुटुंबीयांनाही त्रास होईल. समोरची व्यक्ती कोणत्या परिस्थितीतून जात असते, याचा अंदाजही तुम्हाला नसतो”, अशा शब्दांत तिने राग व्यक्त केला.
सईदाचा जन्म युएईमध्ये झाला आणि न्यूयॉर्क, अमेरिकेत ती लहानाची मोठी झाली. ‘द मेकिंग ऑफ अ लेजंड’ या पाकिस्तानी चित्रपटातून तिने पदार्पण केलं. इमरान खान यांचा हा बायोपिक होता आणि त्यात तिने त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी जेमिमा गोल्डस्मिथची भूमिका साकारली होती.