ओटीटीवरील सर्वांत लोकप्रिय वेब सीरिज ‘पंचायत’चा तिसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या वेब सीरिजच्या पहिल्या दोन्ही सिझनला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. यातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ‘पंचायत’मधील फुलेरा गावात घडणारी ही कथा अनेकांना जवळची वाटू लागली होती. या सीरिजमुळे फुलेरा हे गाव अनेकांच्या नजरेत भरलं. मात्र प्रत्यक्षात हे गाव अस्तित्वातच नाही. ज्याठिकाणी फुलेरा हे रिल गाव वसवण्यात आलं आहे, त्याठिकाणी असलेल्या रिअल गावाचं नाव काय आणि ते कुठे आहे हे तुम्हाला माहित आहे का?
पंचायत या वेब सीरिजमध्ये फुलेरा हे गाव उत्तरप्रदेशमधील बलिया जिल्ह्यात असल्याचं म्हटलं गेलंय. मात्र जिथे या सीरिजचं शूटिंग पार पडलं, ते गाव खरंतर मध्यप्रदेशमध्ये आहे. रिअल लाइफमध्ये मध्यप्रदेशातील सीहोर जिल्ह्यात हे गाव असून त्याचं नवा महोडिया असं आहे. महोडिया नावाच्या गावात ‘पंचायत’चं शूटिंग पार पडलं आहे. या तिसऱ्या सिझनचं शूटिंग महोडिया गावात दोन महिने सुरू होतं.
महोडिया ग्राम पंचायतचे माजी सरपंत प्रतिनिधी लाल सिंह सिसोसिया यांच्या घरातसुद्धा ‘पंचायत 3’चं शूटिंग करण्यात आलं होतं. या सीरिजमध्ये प्रधानजींचं जे घर दाखवलं गेलंय, ते खऱ्या आयुष्यात लाल सिंह यांचं घर आहे. पंचायच्या पहिल्या सिझनमध्ये पाण्याच्या टाकीने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं होतं. कारण या टाकीवरच सचिवजी आणि रिंकीची पहिल्यांदा भेट झाली होती. ती पाण्याची टाकीसुद्धा याच गावात आहे. ‘पंचायत’च्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनचंही शूटिंग महोडिया या गावातच पार पडलं होतं. या वेब सीरिजमुळे महोडिया गावात फिरायला येणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली. मात्र सीरिजमध्ये गावाचं मूळ नाव बदलल्याची नाराजी काही गावकऱ्यांमध्ये अजूनही आहे.
‘पंचायत 3’चं शूटिंग भर उन्हाळ्यात पार पडलं होतं. 45 ते 47 अंश सेल्सिअस तापमानात कलाकारांनी शूटिंग पूर्ण केलं होतं. गावातील आयुष्याचं साधंसरळ आणि मनाला भावणारं चित्रण हेच या सीरिजचं यश आहे. ‘पंचायत 3’चं दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केलं असून त्यात जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीना गुप्ता, सानविका, चंदन रॉय, फैजल मलिक, दुर्गेश कुमार, सुनिता राजवर, पंकज झा यांच्या भूमिका आहेत.