‘बाबाच्या करिअरवर बोलण्याआधी..”; पंढरीनाथच्या लेकीने जान्हवीला चांगलंच सुनावलं

| Updated on: Aug 22, 2024 | 9:15 AM

'बिग बॉस मराठी 5'च्या घरात टास्कदरम्यान पुन्हा एकदा दोन्ही गटात वाद झाले. यावेळी जान्हवीने मात्र पंढरीनाथ कांबळेवर जी टीका केली, त्यावरून अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आता पंढरीनाथच्या मुलीनेच पोस्ट लिहित जान्हवीला सुनावलं आहे.

बाबाच्या करिअरवर बोलण्याआधी..; पंढरीनाथच्या लेकीने जान्हवीला चांगलंच सुनावलं
पंढरीनाथ कांबळे, जान्हवी किल्लेकर, ग्रिष्मा कांबळे
Image Credit source: Instagram
Follow us on

‘बिग बॉस मराठी 5’चा चौथा आठवडा सुरू असून याची सुरुवातच भांडणाने झाली. नुकतंच घरात ‘सत्याचा पंचनामा’ हा टास्क पार पडला. या टास्कदरम्यान दोन्ही गटात खूप भांडणं झाली. सूत्रसंचालक रितेश देशमुखने ‘भाऊचा धक्का’ एपिसोडमध्ये घरातील सर्व स्पर्धकांना एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावरून टिप्पणी करू नका असं बजावलं होतं. पण ही गोष्ट जान्हवी किल्लेकरकडून पाळली गेली नाही आणि तिने पंढरीनाथ कांबळेच्या करिअरबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. तिने पंढरीनाथ ऊर्फ पॅडीला “आयुष्यभर ओव्हरअ‍ॅक्टिंग करत आहे” असं म्हणत त्याच्या अभिनयाची खिल्ली उडवली. या तिच्या वक्तव्यामुळे घरातील इतर सदस्यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. परंतु जान्हवीच्या या वागण्यामुळे घरातील तणाव वाढला आहे. प्रेक्षक आणि मराठी कलाकारांनीदेखील तिच्या वागण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावरून आता पंढरीनाथच्या मुलीने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

ग्रिष्मा कांबळेची पोस्ट-

‘प्रिय अभिनेत्री जान्हवी किल्लेकर. जितकं स्पष्ट तू स्वतःचं नाव उच्चारत नसशील तितकं स्पष्ट आणि आदराने बाबा तुझं नाव घेतो. मुखावाटे बाहेर पडलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ, महत्त्व, वजन आणि टायमिंग या गोष्टींची समज आणि भान बाबाला आहे हे त्याने सिद्ध केलं आणि म्हणूनच तुझ्या अपमानाला कोणतीही मर्यादा न ओलांडता अगदी संयमाने योग्य असं उत्तर दिलं. खरंतर ‘ओव्हरअॅक्टिंग’ हा शब्द तुझ्या तोंडून निघणं हे हास्यास्पद आहे. हे बघ साधी गोष्ट आहे.. स्पर्धकांच्या घरात सुरू असलेल्या गेमबद्दल तू हवं तेवढं बोलू शकतेस, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्यासाठी, खासकरून वर्षा उसगांवकर आणि बाबाच्या करिअरवर बोलण्याआधी तुला त्यांच्या एवढी मराठी इंडस्ट्रीत स्वतःची ओळख कमवावी लागेल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या असंख्य प्रेक्षकांची मनंही जिंकावी लागतील. कारण नसताना सतत आपल्यापेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने मोठ्या असलेल्या लोकांविषयी अनादर करणं हा गेम नाही’, असं तिने लिहिलंय.

हे सुद्धा वाचा

‘मुळात समोरच्याचा अपमान करणं हा बाबाचा स्वभाव नाही. तुझ्या पातळीला न उतरून त्याने स्वतःची, गेमची आणि विशेष म्हणजे तुझी प्रतिष्ठा राखली आहे. संतापात डोक्याचा ताबा हरवून मनाला वाट्टेल ते बोलणारी तू निक्की तांबोळीची सावलीच आहेस. जेव्हा गेम बाहेर असलेल्या तुझ्या लेकराचा विनाकारण उल्लेख झाला तेव्हा तुला ते पटलं नाही. आज तू गेम बाहेरच्या, बाबाने लेकरासारखाच वाढवलेल्या, फुलवलेल्या करिअरविषयी एवढं बोललीस ते मात्र तुला पटलं? हा तुझा ‘फेअर गेम’ संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय एवढं लक्षात ठेव. त्याच्या संस्कारात वाढली आहे मी, त्यामुळे जर माझ्या बोलण्यामुळे तुझ्या भावना दुखावल्या असतील तर मी तुझी माफी मागते. माझा हेतू फक्त त्याची लेक म्हणून स्वतःचं मत मांडणं एवढाच आहे,’ असं ग्रिष्माने म्हटलंय.

ग्रिष्माच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘खूप कौतुक आहे ज्या पद्धतीने हे लिहिलं आहे त्याबद्दल. शब्द आणि शब्द पटला,’ असं मुग्धा गोडबोलेनं लिहिलंय. तर ‘हर घर ऐसी बेटी भेजो भगवान, शाब्बास पोरी,’ अशा शब्दांत अभिनेत्री विशाखा सुभेदारने कौतुक केलं.
‘हे आहेत संस्कार, एका मुलीने आपल्या पित्याच्या झालेल्या अपमानाचं उत्तर संयमाने आणि अतिशय सभ्य भाषेत दिलं,’ असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.